चंद्रपूरचा रोहित दत्तात्रेय भारतीय अंडर-१९ संघात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019


- १९ वर्षे गट संघात मिळणार राहुल द्रविडचे मार्गदर्शन
 
 
चंद्रपूर, 
 
चंद्रपुरातील उदयोन्मुख फिरकीपटू व विदर्भाचे प्रतिनिधित्व करताना अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजविणारा रोहित दत्तात्रय याची भारताच्या १९ वर्षे गट संघात निवड झाली आहे. 'द वॉल' म्हणून प्रसिद्ध भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड या संघाचा प्रशिक्षक असल्यामुळे त्याचे मार्गदर्शन आता रोहितला मिळणार आहे आणि त्याचा खेळ बहरण्यास मदत होणार आहे.
 
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील सामन्यांसाठी रोहित दत्तात्रयला राष्ट्रीय संघात संधी देण्यात आली आहे. येत्या 20 फेब्रुवारीपासून केरळमधील तिरुअनंतपुरम येथे या मालिकेचा पहिला सामना खेळला जाणार असून दुसरा सामना २६ फेब्रुवारीला होणार आहे. सूरज आहुजाकडे भारतीय चमूचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
 
भारतीय क्रिकेट संघात रोहित दत्तात्रेय याची निवड झाली असल्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत असून त्याला चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. रोहितला लहानपणापासून क्रिकेट खेळण्याचा छंद असून, तो चंद्रपूर महानगरातील जनता महाविद्यालयात इयत्ता १२ वीमध्ये एमसीव्हीसी शाखेत शिक्षण घेत आहे. याआधी रोहितने ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले, तर १९ वर्षे गटाच्या विजय मर्चट राष्ट्रीय स्पर्धेत सुमारे ३७ फलंदाज बाद करून नावलौकिक मिळविला होता. त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रोहित दत्तात्रेय याची १९ वर्षाखालील मुलांच्या भारतीय क्रिकेट चमूत निवड केली आहे. १९ वर्षे गट भारतीय संघात निवड झालेला लेगस्पिनर रोहित दत्तात्रय चंद्रपुरातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.