ब्रम्हपुरीत वादळी पाऊस व गारपीट
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
 
- दुकानांचे फलक तारांवर कोसळले 
 - आठवडी बाजारातील भाजीपाल्याचे नुकसान
 
 
 
ब्रम्हपुरी,
येथे सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस व गारांचा वर्षाव झाल्याने सर्वत्र एकच पळापळ झाली. यात आठवडी बाजारातील भाजीपाला तसेच शेतातील हरबरा, गहू व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. तसेच दुकानांचे फलक कोसळले. 
 
शहरात शुक्रवारी आठवडी बाजार भरत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील भाजीविक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. तसेच मोठमोठ्या गारांचा वर्षाव झाला. त्यामुळे बाजारात भाजी विक्रेते व ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली.
 
 
 
भाजी विक्रेते व नागरिकांनी आजूबाजूला आडोसा शोधण्यास सुरूवात केली. मुसळधार पावसामुळे निघालेल्या लोटाने भाजीविक्रेत्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. जोरदार वादळामुळे शहरात ठिकठिकाणच्या चौकात लावण्यात आलेले फलक व दुकानांचे शेड उडून विजेच्या तारांवर पडले. आरमोरी मार्गावर एक चारचाकी वाहन उलटले. दरम्यान तालुक्यातही अनेक ठिकाणी वादळी पाऊस व गारपिटीने शेतातील हरबरा, गहू व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.