वर्ध्यात महिलेचा दिवसा ढवळ्या खून
   दिनांक :15-Feb-2019
हिंगणघाट,
येथील संत तुकडोजी वार्डात राहणाऱ्या रिता प्रमोद ढगे (वय ४५) या विवाहित महिलेच्या घरात जवळच राहणाऱ्या एका इसमाने शिरून चाकूने हल्ला केला. यात महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी सेवाग्रामला नेले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. दिवसा ढवळ्या झालेल्या या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
 
 
ही घटना आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. रिता प्रमोदराव ढगे ही महिला दुपारी घरी स्वयंपाकघरात एकटी असताना घराजवळच राहणारा वाल्मिक लक्ष्मणराव चंदनखेडे याने घरात प्रवेश केला. दरम्यान सदर इसमाने महिलेवर अकस्मात चाकूने हल्ला चढविला, यात ती रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडली. सदर महिलेने जीवाच्या आकांताने आरडाओरडा केली, त्यामुळे परिसरातील रहिवाशी धावून आले असता सदर इसम त्यांच्यावरही धावून गेला व संधी साधून तेथून पसार झाला, सदर महिलेचे पती प्रमोद कृष्णाजी ढगे हे कोरा येथील विकास विध्यालयात शिक्षक असून घटनेच्या वेळी ते शाळेत होते.
 
मृतक महिलेचा मुलगा सावंगी मेघे येथे वैद्यकीय शिक्षण घेत असून मुलगी पुण्यात नोकरीवर आहे, मुलीचे मे महिन्यात लग्न ठरलेले आहे. या घटनेत जखमी महिलेला परिसरातील नागरिकांनी उपचाराकरता उपजिल्हारुग्नालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर तिला सेवाग्राम येथे पाठविण्यात आले दरम्यान रस्त्यात तिचा मृत्यू झाला. या खुनाचे कारण अध्याप पुढे आलेले नाही.