खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २२ वर्षानंतर जेरबंद
   दिनांक :15-Feb-2019
  
 
 
-खोटे नाव धारण करून होता फरार
 
चंद्रपूर, 
खुन करून फरार झाल्यानंतर खोटे नाव धारण करून वावरत असलेल्या आरोपीला तब्बल २२ वर्षांनी शेगाव पोलिसांनी अटक केली. संभा विठू बावणे असे आरोपीचे नाव आहे.
 
अर्जुनी येथील नाना पाईनकर हा २ जुलै १९९६ रोजी चारगाव (खुर्द) येथील बैल बाजारातून गावाकडे परतत असताना त्याला रस्त्यामध्ये आरोपी संभा बावणे भेटला. आरोपी व नाना पोईनकर यांचा मुलगा या दोघांमध्ये काही दिवसापूर्वी किरकोळ भांडण झाले होते. संभाने त्या कारणावरून नाना पाईनकर यांच्यासोबत वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपीने त्याच्याजवळील कुर्‍हाडीने नाना पोईनकर याच्या डोक्यावर घाव घालून त्याची हत्या केली. या घटनेबाबत मारोती जुंबाडे यांच्या तक्रारीवरून संभा बावणे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, आरोपी संभा बावणे हा तेव्हापासून फरार होता. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्याचा प्रभार घेतल्यापासून त्यांनी फरार व पाहीजे असलेल्या आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्यासाठी प्रभारी अधिकार्‍यांना वेळावेळी सुचना व मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली होती. पाहीजे असलेला आरोपी संभा याचा शोध सुरूच ठेवत तब्बल २२ वर्षानंतर माहिती हस्तगत करीत शेगाव पोलिसांनी त्याला नागपूर जिल्ह्यातील रुई येथून जेरबंद केले.
 
खुन करून फारार झाल्यानंतर संभा हा अर्जुनी गावात आलाच नाही. तब्बल २० वर्षे तो पुण्यामध्ये राहीला. या दरम्यान त्याने त्याचे स्वत:चे नाव बंडू विठ्ठल बावणे असे धारण करीत कागदपत्रे सुध्दा याच नावाने तयार करुन घेतले. पुणे येथे राहताना संभा याने दुसरा विवाह केला. परंतु, दुसरी पत्नी मरण पावल्यानंतर तो अंदाजे ३ वर्षापासून नागपूर जिल्ह्यातील रुई खैरी येथे येवून त्याची पहिली पत्नी कल्पना हीच्यासोबत राहू लागला. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, शेगाव पोलिस पुढील तपास करीत आहे.