दुमजली 'ए३८० सुपरजम्बो' विमानाचे उत्पादन थांबणार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 प्रचंड खर्चामुळे विमान कंपन्यांचा अपेक्षित प्रतिसाद लाभत नसलेल्या 'ए३८० सुपरजम्बो' या दुमजली विमानाचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय विमान निर्मितीतील मतब्बर युरोपियन कंपनी असलेल्या'एअरबस'ने घेतला आहे. कंपनीने गुरुवारी याबाबतची घोषणा केली. 
 
 
तब्बल दशकभरापासून सेवेत असलेल्या या विमानांची निर्मिती २०२१पासून बंद करण्यात येणार आहे. 'एअरबस'ची सर्वांत मोठी ग्राहक असलेल्या दुबईतील एमिरेट्स कंपनीने आपल्या एकूण मागणीतील ३९ विमाने कमी केल्यानंतर मुख्यत्वे विमाननिर्मिती बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. विमानाची किंमत, व्यवस्थापन व इंधन खर्चासह इतर कारणांमुळे विमान कंपन्याकडून या विमानाला अपक्षित प्रतिसाद मिळत नसून, एमिरेट्सनेही विमानांची ऑर्डर १६१वरून कमी करून १२३ केली. या कंपनीची मागणी पूर्ण होईपर्यंत केवळ 'ए३८० सुपरजम्बो'ची निर्मिती सुरू राहील व २०२१मध्ये ती थांबविण्यात येईल. दरम्यान अन्य कोणासाठीही हे विमान बनवले जाणार नाही, असे 'एअरबस'चे सीईओ गुल्लम फौर यांनी नमूद केले.
'ए३८० सुपरजम्बो' ही जगातील सर्वोत्तम अभियांत्रिकी निर्मितीपैकी एक असून, प्रवाशांनीदेखील या विमानावर खूप प्रेम केले. अर्थात, या विमानाचे उत्पादन बंद होत असल्याबाबत दु:ख होत असल्याचे रॉल्स-रॉयस येथील सिव्हिल एरोस्पेसचे प्रमुख ख्रिस चोलर्टन यांनी सांगितले.