शिक्षकांच्या दबावतंत्राचा ‘दीपाली’ ठरली बळी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
- मृतकाच्या आईचा आरोप : अग्रगामी हायस्कूलमधील प्रकार
वर्धा :
वर्धे जवळच्या पिंपरी (मेघे) येथील अग्रगामी हायस्कूलमध्ये नववीचे शिक्षण घेणाऱ्या दीपाली रवींद्र जानवे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. दीपाली हिच्यावर तिच्या शाळेतील शिक्षकांनी अभ्यासाबाबत अतिशय जास्त मानसिक दडपण आणले होते. त्यांच्या याच दबावाला कंटाळून तिने आत्महत्येसारख कठोर निर्णय घेतला. दीपाली ही अग्रगामी हायस्कूलमधील हेकेखोरवृत्तीच्या शिक्षकांच्या दबावतंत्राचा बळी ठरल्याचा आरोप मृतक दीपालीची आई रश्मी जानवे यांनी केला आहे. या प्रकरणी योग्य कारवाईची मागणी मृतकाच्या कुटुंबियांनी केली आहे. सदर घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे.
 
 
 
 
इतर उपक्रमात राहायची पुढे
शाळेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, खेळ स्पर्धा आदी उपक्रमात दीपाली ही स्वयंस्फूर्तीने भाग घेत होती. तिने आतापर्यंत कुठले असे मोठे पारितोषिक पटकाविले नसले तरी तिचा इतर उपक्रमातील सहभाग कौतुकास्पदच होता, असे सांगण्यात आले.
 
 
शाळेत पार पडलेल्या शिक्षक-पालक सभेत कमी गुण घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लेखी मजकूर घेण्यात आला होता, हे जरी खरे असले तरी तो केवळ पालकांनी आपल्या पाल्याबाबत जागरूक व्हावा यासाठी होता. पूर्वीचा अभ्यासक्रम बदलला असून आता १०० गुणांसाठी विद्यार्थ्यांना लिहावे लागते. जे विद्यार्थी अभ्यासात कमजोर आहेत, त्यांच्यासाठी शाळेच्यावतीने अतिरिक्त विशेष वर्ग घेतले जातात. आम्ही चांगला विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा जोसेफ यांनी दिली.