अघोषित आणिबाणी(?)
   दिनांक :16-Feb-2019
बारसे करायला आलेला पुरोहित जर अंत्येष्टीचे मंत्र म्हणू लागला तर?, एखाद्याच्या वाढदिवशी त्याला दीर्घायुष्य िंचतण्याऐवजी कुणी त्याच्या निधनाबद्दल शोक करू लागले तर?, नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देतानाच कुणी त्यांचा घटस्फोट व्हावा असा आशीर्वाद दिला तर?... स्वाभाविकपणे आपण अशा वेडगळपणाला आवरण्याचा प्रयत्न करू. मात्र तसा प्रयत्न करताच, त्याला आजकाल अघोषित आणिबाणी असे गोंडस नाव देण्यात येते! प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 9 फेब्रुवारी 2019 रोजी या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेते अमोल पालेकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित राहताना तेथील औचित्याचे भान असले पाहिजे, हे वक्ता म्हणून आम्ही स्वतः जाणतो, पाळतो. पालेकर यांना मात्र हा मंच सरकारविरोधातली आपली नेहमीची मळमळ बाहेर काढण्याची सुवर्णसंधी वाटला. त्यांनी याच कार्यक्रमात बरवे वा त्यांची चित्रे यांच्याबद्दल बोलण्याऐवजी सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका करण्यास सुरुवात केली. वास्तविक पाहता ही टीकादेखील काय होती, तर सांस्कृतिक मंत्रालयाने कलाकारांच्या स्थानिक समिती रद्द करून केंद्रीय पातळीवर निर्णय घेण्यास केलेली सुरुवात, हा पालेकरांच्या आक्षेपाचा केंद्रिंबदू होता. गेल्या सत्तर वर्षांत कला या आवरणाखाली अनेक ठिकाणी डाव्यांनी आपले गड मजबूत करून लोकांची सातत्याने दिशाभूल केली, हे निखळ सत्य आहे. त्याला सुरुंग लागायला सुरुवात झाल्यावर पोटशूळ होणे हे स्वाभाविक आहे. मात्र, तसे करताना आपण यजमानांवरच टीका करतो आहोत, याचे भान ठेवायला नको का? िंकबहुना ते पालेकरांना पुरेपूर होते. मात्र, तरीही त्यांनी हा उद्योग केला. त्यांनी टीका सुरू केल्यावर तेथील अधिकार्‍यांनी त्यांना विषयाला धरून बोलण्याची विनंती केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत ते पुढे बोलतच राहिले, हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर मग भाषणात अडथळा येत असल्याचे सांगत ते बाजूला झाले.

 
 
वास्तविक पाहता, पालेकर यांना अडवायला नकोच होते. तसे केल्याने त्यांना पत्रकार परिषद वगैरे घेण्याची, चर्चा रंगवण्याची आयतीच संधी आयोजकांनी दिली. लक्षात घेण्याजोगी बाब अशी की, हीच माध्यमे तथाकथित पुरोगामी वा समाजवादी मंडळींनी अशीच दादागिरी केल्यावर मात्र अवाक्षराने बोलत नसतात. कै. पु. भा. भावे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना त्यांना भाषण करू दिले गेले नव्हते, याचा उल्लेख माध्यमे किती वेळा करतात? डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या, सांगलीतील शोकसभेत श्रद्धांजली देण्यासाठी गेलेले ज्येष्ठ पत्रलेखक अशोकराव तेलंग त्यांच्या हातातून माईक हिसकावून घेण्यात आला होता आणि त्यांचा अवमान करण्यात आला. हा विवेकवाद होता का? जानेवारी 2019 मध्ये मराठी साहित्य संमेलनातून नयनतारा सहगल यांचे निमंत्रण परत घेतल्या गेल्याच्या निषेधार्थ नाशिक येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस समीर देव नामक युवकाने बोलताना, सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याचा निषेध करत सोबत या देशाला स्वातंत्र्य मिळवताना केवळ दोन-चार कुटुंबांचाच उल्लेख करणे योग्य नाही, असे मत मांडताच, हे बोलण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही, असे सांगत आयोजकांनी त्यांना बोलण्यास मज्जाव केला. वरील घटनांबाबत माध्यमांत काही प्रतिक्रिया उमटली काय? वरील घटनांत अभिव्यक्तिस्वातंत्र्य डावलले गेले नव्हते का?
 
नयनतारा सहगल यांचा उल्लेखच झाला म्हणून आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. त्यांचे साहित्य संमेलनातील रद्द झालेले भाषण ठिकठिकाणी वाटले गेले, त्याचे अभिवाचन करण्यात आले. हे भाषण म्हणजे असत्याच्या आड शासनावर केलेली निरर्गल टीका होती. भाषणात शहरी नक्षलवाद्यांबाबत कणव, िंहदुत्ववाद्यांवर खोटे आरोप, इतिहासाचे िंहदुत्ववादी पुनर्लेखन करत असल्याची आवई, सरकारी संस्थांचे हक्क नाकारण्यात येत असल्याचे आणि कलेवर बंधन येत असल्याचे बेछूट आरोप करण्यात आले होते. एकीकडे साहित्य संमेलनात राजकारणी नकोत, असा सूर लावत दुसरीकडे साहित्य सोडून राजकारणावरच भाषण तयार करायचे, हा अजब उद्योग आहे. तरीही त्यांनाही निमंत्रण नाकारायला नको होते, असेच आमचे मत आहे. कारण, तसे करण्यास आयोजक तथाकथित पुरोगामी थोडीच होते?
 
सहगल वा पालेकर या दोन्ही प्रकरणांत देशात अघोषित आणिबाणी सुरू असल्याची कोल्हेकुई मोठ्या प्रमाणात झाली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 पर्यंत देशावर आणिबाणी लादली होती. या काळात सरकारचा विरोध करणार्‍यांना कुठेही, कधीही अटक गेली जात होती. सुमारे तेरा हजार नेत्यांना अटक झाली होती. वर्तमानपत्रांचे गळे दाबले गेले होते. उच्च न्यायालयांना टाळे ठोकले गेले. इंदिराजींना सारी सत्ता त्यांच्या हाती हवी होती. यासाठीच अंतर्गत आणिबाणी जाहीर करण्यात आली. जेणेकरून इंदिराबाई कितीही काळ सत्तेवर बसू शकणार होत्या. या काळात जगण्याचा मूलभूत हक्कदेखील हिरावून घेण्यात आला होता. म्हणजेच केवळ संशयाचे कारण पुढे करत शासनाने एखाद्या निरपराध व्यक्तीची हत्या केल्यास कुटुंबीयांना दाद मागण्याचा अधिकारही मिळत नाही. असा काळाकुट्‌ट काळ ज्यांनी देशावर लादला, त्याच पक्षातील लोक आणि त्यांची तळी उचलणारे कलाकार, बुद्धिवंत हे अघोषित आणिबाणीची ओरड करत आहेत. शक्य तिथे सातत्याने शासनाला आणि मोदींना व्यक्तिशःदेखील कोसणारे हे लोक अभिव्यक्तिस्वातंत्र्य नाही असे म्हणतात तेव्हा खरच कमाल वाटते!
 
खरेतर अघोषित आणिबाणी लादणारे लोक हे स्वतःच आहेत. विचार करा, डाव्या विचारसरणीच्या किती संघटना उजव्या विचारसरणीच्या वक्ते, लेखक, कलाकार यांना आपल्या मंचावर निमंत्रित करतात? या उलट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र आपल्यावर टीका करणार्‍या व्यक्तींनादेखील अगदी आग्रहाने पुरस्कार देत असतो! हे सारे चित्र पाहता, रामधारी दिनकर यांच्या ‘रश्मिरथी’ या प्रसिद्ध महाकाव्यातले बोल आठवतात-
हमीं धर्मार्थ क्या दहते रहेंगे? सभी कुछ मौन हो सहते रहेंगे?
की देंगे धर्म को बल अन्य जन भी? तजेंगे क्रूरता-छल अन्य जन भी?
कर्णवधप्रसंगी कृष्णाने कर्णाला त्याच्या पापांचा पाढा वाचून दाखवताना काढलेले हे उद्गार आहेत- आजही तितकेच ताजे आणि यथार्थ असलेले!
- परीक्षित शेवडे
...