pakistan should not help most wanted terrorist
   दिनांक :16-Feb-2019
वॉिंशग्टन, 
 
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या काळ्या यादीत असलेले अतिरेकी गट आणि त्यांच्या म्होरक्यांना शस्त्र, आर्थिक व अन्य प्रकारची मदत करणे तत्काळ थांबवा, अशी कडक सूचना अमेरिकेने आज शनिवारी पाकिस्तानला केली आहे.
'जैश-ए-मोहम्मद' या  अतिरेकी गटांना भविष्यात पुलवामासारखे मोठे हल्ले करण्यापासून रोखण्यासाठी भारत जर काही ठोस कारवाई करीत असेल, तर त्यालाही आमचा पाठिंबाच राहील, असे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले.
 
 
 
 
 
 
 
 
पाकिस्तानने 2002 मध्ये जैश संघटनेवर बंदी घातली, पण हा गट अजूनही या देशात सक्रिय आहे आणि या गटाचा म्होरक्या मौलाना मसुद अझहर व इतर नेते पाकिस्तानात मुक्तपणे फिरत आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही 2001 मध्ये जैशला आंतरराष्ट्रीय अतिरेकी गटांच्या काळ्या यादीत टाकले आहे, त्यामुळे या गटाच्या कारवाया रोखण्यासाठी आमचा पूर्ण पािंठबा आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
 
कोणत्याही अतिरेक्यांना आपल्या भूमीत आश्रय न देणे, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणे आणि त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याचे वचन पाकिस्तानने सुरक्षा परिषदेला दिले आहे. या वचनांची पाकिस्तानने विनाविलंब पूर्तता करावी, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे प्रवक्ता म्हणाला.
 
पुलवामा हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केली काय, असे विचारले असता, त्यांनी कुठलेही उत्तर दिले नाही. जैशचा म्होरक्या मौलाना मसुद अझहरचा संयुक्त राष्ट्राच्या काळ्या यादीत समावेश करण्याच्या भारताच्या मागणीला विरोध करणार्‍या चीनबाबत बोलण्यासही त्यांनी नकार दिला. तथापि, मसुद अझहर आणि त्याच्या संघटनेच्या कारवायांमुळे दक्षिण आशियात अस्थिरता निर्माण होत आहे, ही सत्यता आम्ही कदापि नाकारत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.