शहीद नितीन राठोड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
   दिनांक :16-Feb-2019
बुलढाणा:
शहीद जवान नितीन राठोड यांच्यावर चोरपांग्रा येथील गोवर्धन नगर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या साक्षीने शासकीय इतमामात आज, सायंकाळी 5.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रारंभी शहीद नितीन राठोड यांचे पार्थिव लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथे दाखल होताच नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर पार्थिव शहीद नितीन राठोड यांच्या निवासस्थानी गोवर्धन नगर येथे आणण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायांनी शहीद नितीन राठोड अमर रहे, पाकीस्तान मुर्दाबाद, वंदे मातर्म, भारत माता की जयच्या घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
 
 
 
 
 
अंत्यविधी प्रसंगी शहीद नितीन राठोड यांचे वडील शिवाजी राठोड, आई सावित्रीबाई, पत्नी वंदना, मुलगा जीवन, मुलगी जिवीका, भाऊ प्रवीण उपस्थित होते. त्यांच्या पार्थिवाला वडील शिवाजी व भाऊ प्रवीण यांनी भडाग्नी दिली. साश्रु नयनांनी लाखोंच्या संख्येने नागरिकांनी शहीद जवान नितीन राठोड यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. याप्रसंगी गोवर्धन नगर येथे आलेल्या नागरिकांच्या भावना अनावर झाल्या होत्या.