सलग दुसर्‍या वर्षी विदर्भाला इराणी करंडक- अथर्व, सतीशची अर्धशतकी खेळी- अक्षय कर्णेवार सामनावीर
   दिनांक :16-Feb-2019
नागपूर,
सलग दुसर्‍यांदा रणजी करंडक िंजकणार्‍या विदर्भाने आता आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करत सलग दुसर्‍यांदा इराणी करंडक िंजकला. सामन्याच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला व रणजी विजेत्या विदर्भाने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर इराणी करंडक विजेतेपदावर आपले नाव कोरले.
 
 

 
 
शेष भारताने पहिल्या डावात 330 धावा काढल्या होत्या, प्रत्युत्तरात विदर्भाने अक्षय कर्णेवारच्या दमदार शतकाच्या जोरावर 425 धावा उभारल्या. शेष भारताने 3 बाद 374 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला होता. त्यानंतर विदर्भाने 5 बाद 269 धावा काढल्या होत्या. याचदरम्यान दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या सहमतीने सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसर्‍या डावात विदर्भासाठी गणेश सतीशने 87 व अथर्वने 72 धावा फटकावल्या.
जामठ्यातील व्हीसीए मैदानावर खेळल्या गेलेल्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेत शेष भारताने विदर्भ संघासमोर 280 धावांचे लक्ष्य विजयासाठी ठेवले. चौथ्या दिवशी अंकित राजपूतच्या पहिल्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर फैझ फझल त्रिफळाचित झाला. त्यानंतर दिवसाखेर विदर्भ संघाने एक गडी गमवित 37 धावा केल्या होत्या.
पाचव्या शेवटच्या दिवसाच्या खेळाची सुरुवात अथर्व तायडे व संजय रामास्वामीने केली. पहिल्या सत्रात दोघांनीही दमदार खेळी करीत विदर्भ संघासाठी 278 चेंडूत तब्बल 116 धावांची भागीदारी उभारली. परंतु याच धावसंख्येवर 42 धावांवर संजय रामास्वामीला चहरने पायचित केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या गणेश सतीशने तायडेच्या मदतीने 30 धावांची भागीदारी उभारली. परंतु तायडेला 72 धावांवर चहरने पायचित केले. दरम्यान एका बाजूने संघाचा डाव सावरुन धरलेल्या सतीशने आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु आक्रमक खेळी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोहीत काळेला 37 धावांवर धर्मेंद्रिंसह जडेजाने तन्वीर हककडे झेलबाद केले. पुढे फलंदाजीला आलेल्या अक्षय वाडकरने सतीशच्या साथीने संघासाठी 40 धावांची भागीदारी केली. परंतु शतक करण्याच्या विचाराने आक्रमक खेळीच्या नादात संघाची धावसंख्या 269 झाली असतांना विहारीच्या गोलंदाजीवर गणेश सतीश 87 धावांवर सीमारेषेजवळ असलेल्या वारियरकडून झेलबाद झाला. त्यानंतर पुढील षटकात एक चेंडू टाकल्यावर दोन्ही संघाच्या कर्णधाराच्या संमतीने सामना अनिर्णित ठेवण्यात आला, मात्र पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विदर्भ संघाला विजयी घोषित करण्यात आले. ज्यावेळी सामना अनिर्णित जाहीर करण्यात आला, त्यावेळेस विदर्भ संघाला विजयासाठी केवळ अकरा धावांची गरज होती. 10 धावांची खेळी करीत अक्षय वाडकर हा नाबाद राहिला. गोलंदाजीत राहुल चहरने दोन तर अंकित राजपूत, धर्मेंद्रिंसह जडेजा, हनुमा विहारीने प्रत्येकी एक गडी बाद केला. पहिल्या डावात दमदार शतकी खेळी करणार्‍या अक्षय कर्णेवारला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.