america supports indias right to defence
   दिनांक :16-Feb-2019
नवी दिल्ली/वॉिंशग्टन,
 
भारताला स्वरक्षणाचा संपूर्ण अधिकार आणि त्यासाठी भारत जे काही पाऊल उचलेल, त्यालाही आमचे पूर्ण समर्थन राहील, असे स्पष्ट मत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी आज शनिवारी व्यक्त केले.
 
बोल्टन यांनी आज सकाळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना फोन केला आणि अमेरिकन प्रशासन भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही दिली. दहशतवादाविरोधात भारताची पुढील रणनीती काय असेल, अशी विचारणा करतानाच, भारताने स्वरक्षणासाठी ठोस पाऊल उचलायलाच हवे, तो त्यांचा अधिकारच आहे, असे नमूद करून बोल्टन यांनी, पाकिस्तानलाही ठणकावले. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि अन्य दहशतवादी गटांना आपल्या भूमीत आश्रय देणे पाकिस्तानने बंद करावे आणि या सर्वच गटांविरुद्ध कारवाई करावी, अशी ताकिदही बोल्टन यांनी दिली. 
 
 
 
 

 
 
 
 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार भारत दहशतवाद्यांविरोधात आवश्यक ती कारवाई करू शकतो, यावर बोल्टन आणि डोवाल यांचे एकमत झाले. सोबतच, जैशचा म्होरक्या मौलाना मसुद अझहरला जागतिक दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याच्या मार्गात असलेले अडथळेही शक्य तितक्या लवकर दूर करण्याचा निर्धारही दोन्ही देशांनी व्यक्त केला, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
 
 
सीमापार दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी भारत पाऊल उचलू शकते, या डोवाल यांच्या भूमिकेला माझा पूर्ण पािंठबा आहे. यासाठी भारताला अमेरिकेकडून जे काही सहकार्य हवे असेल ते देखील तत्काळ करण्याची हमीही मी डोवाल यांना दिली आहे. मी स्वत: पुढाकार घेऊन डोवाल यांना फोन केला आणि पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती संवेदना व्यक्त केल्या, असे बोल्टन यांनी वॉिंशग्टन येथे वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पाकिस्तानने त्यांच्या भूमीत सकि‘य असलेल्या सर्वच अतिरेकी गटांवर कारवाई करायलाच हवी, या अमेरिकेच्या भूमिकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
 
 
जैश-ए-मोहम्मदची सर्व सूत्र पाकिस्तानातून हलवली जात असल्याने, जैश व इतर सर्वच गटांचे पाकिस्तानातील अस्तित्व संपविण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यास अमेरिका तयार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.