वन्यजीवसंवर्धनाची दशा आणि दिशा...
   दिनांक :17-Feb-2019
 मागील काही काळात घडलेल्या घटना पाहता, वन्यप्राणिसंवर्धनाची दशा सध्या काय आहे आणि पुढील दिशा काय असणार आहे, याचा अंदाज लावणं अतिशय कठीण असल्याचं जाणवतं. नुकतीच मेळघाट येथे घडलेली घटना िंचता वाढवणारीच आहे. इथे जंगलाच्या आत राहणार्‍या आदिवासींना 2012 मध्ये दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आले होते. परंतु, तिथे सुविधांचा अभाव असल्याचे कारण पुढे करून हे आदिवासी परत आपल्या मूळ गावात राहायला आले. वनविभागाकडून त्यांना परत जाण्यासाठी अनेक प्रकारे समजावण्यात आले, परंतु ते जाण्यास तयार नव्हते. त्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं. शेवटी दिनांक 23 जानेवारी रोजी काही वनाधिकारी आणि कर्मचारी त्यांच्याशी बोलणी करण्याकरिता गेले असताना गावकर्‍यांनी त्यांच्यावर अचानक सशस्त्र हल्ला केला, यात अनेक अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. ही घटना वनविभाग आणि वन्यजीवप्रेमींसाठी अतिशय गंभीर आणि िंचता वाढवणारीच होती. वन्यजीवप्रेमींकडून सातत्याने ही मागणी होत असते की, राखीव जंगलांच्या कोअर क्षेत्रात असलेल्या वस्त्या इतरत्र हलवाव्या आणि तिथे राहणार्‍या लोकांना दुसरीकडे स्थलांतरित करावे. परंतु, या घटनेने त्यांच्या या मागणीला खीळ बसल्यासारखेच झाले आहे. याविषयी वन्यजीवप्रेमींचं असं म्हणणं आहे की, सततच्या विकासकार्यांमुळे दिवसेंदिवस वनक्षेत्र कमी होत आहे. त्यातल्या त्यात राखीव जंगलात आदिवासींची गावे असल्यामुळे वाघ-मनुष्य संघर्षाच्या घटना वारंवार घडत आहेत. म्हणून ही गावे इतरत्र हलवण्यात यावी.
 
वन्यप्राण्यांना अभय मिळावे आणि त्यांना आपल्या हक्काची जागा असावी यासाठी शासनाने अनेक अभयारण्यांची निर्मिती केली. त्यासाठी घनदाट वन असलेल्या क्षेत्रांची निवड केली. परंतु, या वनक्षेत्रांमध्ये आदिवासींची अनेक छोटी छोटी गावे वसलेली होती. हे आदिवासी पिढ्यान्‌पिढ्या तिथे राहात आलेले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात मोठ्या प्रमाणात जंगल होतं. त्या काळात जंगलात राहणारे आदिवासी आणि वन्यप्राणी गुण्यागोिंवदाने राहात असत. परंतु, स्वातंत्र्यानंतर मात्र जसजशे विकासकार्य होत गेले, शहरी क्षेत्र वाढत गेले, औद्योगिक क्षेत्र तयार होत गेले, महामार्ग आणि लोहमार्गांचे जाळे वाढत गेले तसतसे वनक्षेत्रदेखील कमीकमी होत गेले. त्यासोबतच वन्यप्राणी आणि वाघांची संख्यादेखील घटत गेली. एक वेळ अशी आली की, वाघ हा प्राणी विलुप्त होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. वन्यजीवप्रेमींनी अशी िंचता व्यक्त करताच, 70 च्या दशकात प्रोजेक्ट टायगर ही संकल्पना अस्तित्वात आली आणि वाघांची व इतर वन्यप्राण्यांची संख्या वाढावी याकरिता घनदाट वने असलेल्या क्षेत्रांना राखीव वनक्षेत्र घोषित करून अभयारण्ये आणि टायगर रिझर्व तयार करण्यात आले. या अभयारण्यांच्या कोअर क्षेत्रात आदिवासींची अनेक गावे आलीत. प्रोजेक्ट टायगरचा उद्देश हा होता की, वाघांना व इतर सर्व वन्यप्राण्यांना मनमोकळेपणाने कुठल्याही धोक्याविना राहता यावे, परंतु त्याला या आदिवासी गावांचा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे या आदिवासींची गावे जंगलातून हलवून त्यांना इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अशी कल्पता मांडण्यात आली. त्यानंतर आदिवासींना इतरत्र स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू झाले, परंतु आदिवासी काही मानत नव्हते. याउलट, बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर तिथून जे बंगाली लोकं भारतात आले होते, त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल क्षेत्रातच जमिनी देऊन वसवण्यात आले. त्यांच्यासाठी आणखी जंगलतोड केली गेली. हा निर्णय चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल आणि वन्यप्राण्यांसाठी आणखी घातक ठरला. आदिवासींना जंगलाबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना उलट बंगाली लोकांना तिथे नेऊन वसवण्याचा हा निर्णय किती चुकीचा होता, हे आता निदर्शनास येत आहे. ज्या ज्या जागी बंगाली लोकांना वसण्यात आले तिथले वन्यप्राणी आश्चर्यकारकपणे संपल्याचे चित्र आज दिसत आहे. असो.

 
 
तेव्हापासून सुरू झालेले हे प्रयत्न आजतागायत सुरूच आहेत. आजही अनेक अभयारण्यांमध्ये आदिवासींची अनेक गावे वसलेली आहेत. आज स्थिती अशी आहे की, मागील काही वर्षांत सर्वांच्या प्रयत्नाने वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. आदिवासींची गावे जंगलात असल्यामुळे अनेक अप्रिय घटनादेखील घडत आहेत आणि वाघ-मानव संघर्षाच्या घटना वाढत चालल्या आहेत. वाघांची संख्या वाढल्यामुळे त्यांना जंगलात राहण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे वाघ जंगलाबाहेर पडत आहेत. त्यांनी जावे कुठे, ही एक फार मोठी समस्या आहे. कारण संरक्षित जंगल जर सोडले तर इतर कुठेही वनक्षेत्र नाही, त्यामुळे सध्या वाघ कुठेही दृष्टिपथात पडत आहेत. जंगलाच्या आत आणि जंगलालगत असलेल्या गावातील लोकं सरपण वेचण्यासाठी, तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी अथवा इतर वनोपज गोळा करण्यासाठी जंगलात जातात. त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर वाघांचे हल्ले होत असतात. मागील 3-4 वर्षांत वाघ, बिबट, अस्वल िंकवा रानडुक्कर यासारख्या िंहस्र प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक लोकांचा बळी गलेला आहे. गावकर्‍यांना वनविभाग आणि स्वयंसेवी संस्थांकडून अनेकदा जंगलात असुरक्षितपणे न जाण्याबद्‌दल समजावण्यात आले आहे, तरी गावकरी या सल्ल्याला न जुमानता जंगलात जाण्याचा धोका पत्करतात. एखाद्या प्राण्याच्या हल्ल्यात गावातील कुणी मारला गेल्यास गावकरी आंदोलन करतात आणि वनकर्मचार्‍यांवर आपला रोष व्यक्त करतात. आताशा हा एक नवीनच ट्रेंड सुरू होऊ पाहतोय की, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दोन, चार लोकांचा बळी गेला की आंदोलन करणे, वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी करणे, मग गावकर्‍यांच्या मदतीसाठी स्थानिक नेतेमंडळींचे धावून येणे आणि वनाधिकार्‍यांकडून वाघाच्या बंदोबस्ताचे आश्वासन मिळेपर्यंत प्रेत न उचलण्याचा हेका धरणे वगैरे. इत्यादी प्रकार वाढत चालले आहेत. वाघाच्या बंदोबस्ताची मागणी म्हणजे सरळसोट वाघाला ठार करणे, हेच गावकर्‍यांना अभिप्रेत असतं. अशा वेळी काय करावे व काय करू नये, ही एक अतिशय गुंतागुंतीची समस्या निर्माण होते. कारण एकीकडे गावकर्‍यांची मागणी आणि राजकीय पुढार्‍यांचा दबाव वनाधिकार्‍यांवर असतो, तर दुसरीकडे वन्यजीवप्रेमी याच्या विरोधात असतात. त्यांचाही दबाव, तिसरीकडे राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा दबाव आणि चौथीकडे शासन, प्रशासनाचा दबाव, असा चोहोबाजूंनी वनाधिकार्‍यांवर दबाव निर्माण होतो. अशा वेळी वनाधिकार्‍यांकडून संरक्षणात्मक म्हणजे डीफेन्सिव्ह असा निर्णय घेतला जातो. तो म्हणजे वाघाला डार्ट मारून बेशुद्ध करणे आणि बंदिस्त करून दुसरीकडे नेऊन सोडणे. परंतु, हा निर्णय अंमलात आणण्यासाठीच्या तांत्रिक बाबींचा वनविभागाजवळ अभाव आहे, असे खेदानेच म्हणावे लागते. डार्ट मारण्यासाठी अनेक तांत्रिक बाबी असणे गरजेचे आहे. एक तर डार्ट मारणारा पक्का नेमबाज असला पाहिजे, जेणेकरून त्याचा नेम चुकता कामा नये. कारण जर नेम चुकला आणि वा बेशुद्ध झाला नाही तर तो फिरून डार्ट मारणार्‍यावरच हल्ला करण्याची शक्यता असते. यातही एक सर्वात मोठी अडचण अशी असते की, घनदाट जंगलात डार्ट मारणे, ही काही सोपी गोष्ट नसते. ज्याप्रमाणे बंदुकीची गोळी सरळ रेषेत जाते, तसं डार्टचं नसते. कारण डार्ट हा रबरी असतो. घनदाट जंगलात जरी अचूक नेम धरून डार्ट मारला, पण जर त्याच्या मार्गात एखाद्या झाडाचं पान जरी आलं तर तो आपला मार्ग बदलतो आणि निशाण्यावर न लागता इतरत्र जातो. हा एक फार मोठा धोका असतो. असा धोका पत्करण्याची क्षमता असलेले कर्मचारी वनविभागात अभावानेच आढळतात.
 
डार्ट मारण्याचा निर्णय घेतल्यानंतर वनविभागातर्फे वाघाचा शोध सुरू होतो, परंतु अनेक दिवस शोध घेऊनही वनकर्मचार्‍यांना वाघ काही सापडत नाही. तोपर्यंत वाघाने आणखी चारदोन बळी घेतलेले असतात आणि त्यावरून गावकर्‍यांचा रोष वाढत चाललेला असतो. आता वनकर्मचार्‍यांना वाघ खरंच सापडत नाही की, ‘आम्ही प्रयत्न करत आहोत, पण त्यात आम्हाला यश येत नाही आहे,’ असं सांगून चालढकल करण्यासाठी केलेला तो केवळ एक बहाणा असतो, हे काही सांगता येत नाही. शेवटी हे प्रकरण कोर्टात जाते आणि कोर्टातून वाघाला ठार करण्याचा आदेश येतो. यात एक संशय असा येतो की, वनविभाग आतापर्यंत केवळ टाईमपास करत होते आणि असा आदेश येण्याची वाट पाहात होते की काय? कोर्टाकडून असा आदेश येताच वन्यजीवप्रेमी अचानक सक्रिय होतात आणि या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करतात आणि वाघाला वाचविण्यासाठी आंदोलन सुरू करतात. आता इथेही द्विधा परिस्थिती निर्माण होते. एकीकडे गावकर्‍यांचे वाघाला ठार करण्यासाठीचे आंदोलन आणि दुसरीकडे वन्यजीवप्रेमींचे वाघाला वाचविण्यासाठीचे आंदोलन. पुन्हा हे प्रकरण लटकत जाते. परंतु, शेवटी वन्यजीवप्रेमींवर गावकरी आणि राजकीय पुढारी वरचढ ठरतात आणि वाघाला ठार करण्याचा आदेश जारी होतो.
मागील एक वर्षात अशा दोन घटना घडल्या आहेत. पहिली घटना ऑक्टोबर 2017 मधील आहे. ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात एका वाघिणीने काही लोकांवर हल्ले केले होते. तिला पकडून बोर अभयारण्यात सोडण्यात आले, परंतु ती अभयारण्याबाहेर पडून इकडेतिकडे भटकत राहिली. यादरम्यान तिने 9 लोकांवर हल्ले केल्याचे सांगतिले जाते. शेवटी कोर्टाने तिला ठार करण्याचा आदेश दिला. तिला ठार करण्यासाठी शार्पशूटर तिच्या शोधात होता, परंतु ती त्याला गवसली नाही. शेवटी या वाघिणीचा वर्धा जिल्ह्यातील िंसदीविहीर येथे विजेचा झटका लागून मृत्यू झाला. दुसरे प्रकरण यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील ‘टी-1’ म्हणजेच अवनी या वाघिणीचे प्रकरण ताजेच आहे. या वाघिणीबद्दल वर्षभरात काय काय नाट्य घडले हे सर्वांना माहितीच असेल. कारण हे प्रकण वर्तमानपत्रांमधून बरेच गाजले होते. अशा घटना आता वारंवार घडत राहतील की काय, हीच भीती आहे. कारण संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे वाघांची संख्या वाढत आहे. एकट्या ताडोबाच्याच कोअर क्षेत्रात जितके वाघ आहेत त्यापेक्षा जास्त वाघ क्षेत्राबाहेरच्या जंगलात असल्याचा अंदाज आहे. त्यातल्या त्यात जंगलात आणि जंगलालगत अनेक गावं आहेत. त्यामुळे माणसांवर वाघांचे हल्ले ही नित्याचीच बाब झाली आहे. ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात तर अशा घटना घडण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यावर उपाय शोधणे सध्यातरी अतिशय अवघड वाटत आहे. त्याकरिता गावकर्‍यांना जंगलातून हलवून जंगलापासून दूर त्यांना स्थलांतरित करणे, हाच एक अंतिम उपाय होऊ शकतो. परंतु, गावकरी स्थलांतरित होण्यास तयार नाहीत ही एक मोठीच समस्या आहे आणि जर त्यांना बळजबरीने स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला गेला, तर मग अशा मेळघाटसारख्या घटना घडतात. गावकर्‍यांवर बळजबरी होऊ नये, हेही तितकेच खरे आहे. त्यांचे मतपरिवर्तन करूनच त्यांना स्थलांतरित करायला हवे. आता ही वेळ अशी आहे की काय करावे व काय नाही, हेच कळेनासे झाले आहे.
 
विदर्भात अनेक वन्यप्राणी संवर्धक संस्था आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने वेगवेगळे उपाय सांगतात. कुणी म्हणतात असं करा, कुणी म्हणतात तसं करा. कुणातही एकवाक्यता नाही, हेही तितकेच खरे. जास्तीत जास्त लोक वन्यप्राण्यांचीच बाजू घेताना दिसतात, परंतु वन्यप्राण्यांसोबतच माणसांच्या सुरक्षेची काळजी घेणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे, याकडे कुणी फारसं लक्ष देत नाहीत. आज स्थिती अशी आहे की, गावातील लोकं शेतात जाण्यास घाबरतात, कारण शेतात काम करत असतानादेखील अनेक लोकांवर वाघांचे हल्ले झालेले आहेत. एका कुटुंबातील कुणी मारला जातो तेव्हा त्याचं दु:ख त्या कुटुंबालाच माहिती असतं. आपण त्यांचं दु:ख समजावून न घेता केवळ वाघांच्या रक्षणासाठीच गोष्ट करणं हा दुटप्पीपणा नव्हे काय? वाघांचे रक्षण तर झालेच पाहिजे, यावर दुमत असण्याचं काहीच कारण नाही, परंतु माणसंदेखील वाघांपासून सुरक्षित राहिली पाहिजेत, असा दुहेरी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपण शहरात राहून जंगल भागात राहणार्‍यांच्या समस्या जाणून घेऊ शकत नाही. जंगली भागात राहणार्‍यांची वास्तविकता वेगळी आहे, हेही तितकेच खरे. त्यासाठी जंगलात आणि जंगलालगत राहणार्‍या लोकाना स्थलांतरित करून त्यांना जंगलापासून दूर वसवणे आणि तिथे त्यांना सगळ्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, हाच एकमेव उपाय सध्यातरी दिसतो आहे. त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही उपाय सध्या दृष्टिपथात नाही िंकवा मग दुसरा एक उपाय असाही होऊ शकतो की, संपूर्ण गावाला सौरऊर्जेवर चालणार्‍या विजेचा सौम्य झटका देणार्‍या तारेच्या कुंपणाने वेढून देणे आणि गावकर्‍यांना जंगलात न जाण्याची सक्त ताकीद देणे. हा उपाय कितपत योग्य ठरू शकतो, याबद्दल सध्यातरी काहीही म्हणणे योग्य होणार नाही. जुन्या पिढीतले लोकं वन्यप्राण्यांसोबत जुळवून घेऊन सहजीवन जगले, परंतु आजच्या नवीन पिढीला ते शक्य होत नसल्याचे दिसते. आता नवीन पिढीने जंगलांवर अवलंबून राहणे सोडून दुसरीकडे बसून इतर कामधंदे करायचा विचार करायला हवा.
पुढील पिढींना वाघ केवळ फोटोमध्ये पाहण्याची वेळ येऊ नये, असे आपल्याला वाटत असेल, तर वाघ आणि इतर वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन होणे हीदेखील आज काळाची गरज आहे. वारंवार वाघांना ठार करण्याची वेळ येऊ नये, हे तर महत्त्वाचे आहेच. परंतु, वाघांपासून माणसांचे रक्षण करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
 
मेळघाटामध्ये 23 जानेवारीला घडलेल्या घटनेनंतर तर काही वेगळ्याच अचंबित करणार्‍या मागण्या समोर येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील एका समाजसेविकेने तर चक्क गावकर्‍यांना वाघांपासून आपले रक्षण करण्याकरिता बंदुका देण्याची मागणी केली आहे. ही मागणी खरोखरच रास्त आहे काय? यामुळे वन्यजीवसंवर्धनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल, हा साधासा विचारही या समाजसेविकेने केला नाही, याचं अत्यंत आश्चर्य वाटतं. गावकर्‍यांना बंदुका देण्याची मागणी करणं म्हणजे तर अतीच झालं. अशी मागणी करणं म्हणजे सरळसरळ त्यांना वाघांना ठार करण्याची परवानगी देणेच होय. मागील 45 वर्षांपासून वाघांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न होत असताना, आता या स्टेजवर अशी मागणी करणं म्हणजे आतापर्यंतच्या प्रयत्नांना हरताळ फासणंच नव्हे काय? वास्तविक पाहता सद्य:परिस्थितीत वाघ आणि इतर वन्यप्राण्यांच्या जीविताला काही कमी धोके नाहीत. शेतकरी वन्यप्राण्यांपासून शेतीचे रक्षण करण्यासाठी शेतीभोवतालच्या कुंपणात वीजप्रवाह सोडतात यामुळे अनेक वाघ, बिबट आणि वन्यप्राण्यांचा मृत्यू होत असतो. वाघाने एखाद्या गाय िंकवा बैलाला मारल्यास गावकरी त्या प्राण्याच्या प्रेतावर विष टाकून देतात आणि मग ते विषयुक्त मांस खाऊन अनेक वाघ मृत्यू पावले आहेत. महामार्गावर रस्ते अपघातात अनेक वन्यप्राण्यांचा बळी जात असतो. मागील एक वर्षात 25 पेक्षा जास्त वन्यप्राण्यांचा रस्ते अपघातात बळी गेलेला आहे. वाघ अथवा बिबट्यासारखे प्राणी जर अपघातात जखमी झाले, तर ते अधिक िंहसक होतात आणि चवताळतात. नुकतीच पेंचच्या देवलापार वनपरिक्षेत्रात अशीच घटना घडली. एका वाहनाच्या धडकेने वाघ जखमी झाला. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वनविभागाचे पथक त्याच्या शोधात असताना, त्या चवताळलेल्या जखमी वाघाने वनपरिक्षेत अधिकार्‍यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. वन्यप्राण्यांचा अपघातात बळी जाऊ नये अथवा ते जखमी होऊ नये याकरिता व्याघ्रप्रकल्पांजवळून जाणार्‍या रस्त्यांवर थोड्या थोड्या अंतरावर गतिरोधक तयार करावे आणि ठरावीक अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, जेणेकरून वाहने संथ गतीने चालतील आणि वन्यप्राणी समोर येताच वाहन थांबवतील. जर एखाद्या वाहनाने जास्तच निष्काळजीपणा करून वन्यप्राण्याला धडक मारलीच, तर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात त्याचे चित्रीकरण होईल आणि त्या वाहनावर कारवाई करणे शक्य होईल. या मागण्या अनेक वर्षांपासून स्वयंसेवी संस्थांकडून केल्या जात आहेत, परंतु तिकडे शासनाचे दुर्लक्षच होत आहे. या धोक्यांव्यतिरिक्त अवैध शिकार हेदेखील वन्यप्राण्यांच्या जीवितासाठी एक मोठा धोका आहे. इतके अनेक धोके वन्यप्राण्यांमागे असताना गावकर्‍यांना बंदुका देण्याची मागणी म्हणजे वाघांना सरसकट संपवण्याच्याच गोष्टी करणं होय. या पुढारी लोकांनी अशा अवास्तव मागण्या करण्याऐवजी गावकर्‍यांना दुसरीकडे पुनर्वसित करण्यासाठी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करायला हवेत. ते जास्त सयुक्तिक ठरेल. यामुळे वन्यप्राण्यांचेही रक्षण होईल आणि माणसांचेही.
 
दिवसेंदिवस माणसांची संख्या वाढत आहे, त्यामानाने मानवी वस्त्या वाढत आहेत. शहरे विस्तारत चालली आहेत. माणसांच्या सुविधेकरिता विकासकार्ये आवश्यक असल्यामुळे अनेक विकासकामे वाढत चालली आहेत. वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. रस्त्यांवर रहदारी वाढत असल्यामुळे महामार्गांचे चौपदरीकरण, रुंदीकरण आवश्यक झाले आहे. या सर्व कारणांनी जंगलक्षेत्र संकुचित होत चालले आहेत. अशा संकुचित झालेल्या वनात किती वन्यप्राणी आणि वाघ राहू शकतील? कारण प्रत्येक वाघाला आपले वेगळे क्षेत्र हवे असते. वाघांची संख्या वाढली तर आपले क्षेत्र निर्माण करण्याकरिता त्यांच्यात संघर्ष होतो, त्यामुळे आपल्या वेगळ्या क्षेत्राच्या शोधात वाघ जंगलाबाहेर पडतात. आज अशी वेळ आली आहे की, वाघ कुठेही दिसायला लागले आहेत. वाघ आपले शेजारी झाले आहेत. आता कधी आणि कुठे वाघ दिसेल याचा काहीच नेम राहिलेला नाही. म्हणून आता आपल्याला वाघासोबत राहण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. आता ती काळाची गरज झालेली आहे. वाघाला केवळ फोटोमध्ये पाहण्याची वेळ येऊ नये, असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला एवढं सहन करावंच लागेल. वन्यप्राण्यांविना पृथ्वीची कल्पना आपण करूच शकत नाही. वाघही जगले पाहिजे, इतर वन्यप्राणीही जगले पाहिजेत आणि माणूसही सुरक्षित राहिला पाहिजे, तरच पुढे काही आशादायी चित्र दिसेल, अन्यथा वाघ- मानव संघर्ष असाच वाढत राहील आणि वन्यप्राणिसंवर्धनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही. एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाची वन्यप्राण्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. हे समजावून घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ‘सेव्ह टायगर’ ही केवळ घोषणा न राहता त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करण्याची गरज आहे आज वन्यप्राणिसंवर्धनाची दशा कशी झाली आहे हे आपण पाहतो आहोच, परंतु पुढील दिशा काय असेल, हे ठरवणं जरी अवघड वाटत असलं, तरी त्यादृष्टीने प्रयत्न करण्यास काय हरकत आहे?
संजीव हरीदास हेडाऊ