कालिबंगा आणि कुनाल
   दिनांक :17-Feb-2019
हवामान बदलांचा परिणाम आणि भूगर्भात झालेल्या हालचालींचा परिणाम म्हणून यमुना आणि सतलज नद्यांची पात्रं बदलली, सरस्वती नदीला मिळणारं पाणी कमी झालं. काही शतकांनंतर सरस्वती नदी आटली आणि लुप्त झाली. तिच्या काठी वसलेली समृद्ध नगरं हळूहळू लयाला गेली. यातलंच एक नगर आजच्या कालिबंगा, तहसील पिलिबंगा, जिल्हा हनुमानगड, राजस्थान या गावाजवळ वसलं होतं. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे तत्कालीन निदेशक बी.बी.लाल यांच्या नेतृत्वात बालकृष्ण थापर, एम.डी.खरे, के.एम.श्रीवास्तव आणि एस.पी.जैन या चमूनं सन 1960 पासून 69 या कालखंडात आजच्या घग्घर नदीच्या किनारी 9 यशस्वी उत्खननं केली.
 
बी.बी. लालम्हणतात, की- ‘कालीबंगा या ठिकाणाचं उत्खनन करताना दोन पातळ्या असल्याचं लक्षात आलं. वरची पातळी आपल्या पोटात इसवीसन पूर्व 2500 ते 1750 या कालखंडातले पुरावे साठवून होती तर त्या खालच्या पातळीत साधारण इसवीसन पूर्व 3500 ते 2800 वर्षांपूर्वीचे अवशेष दडलेले होते. मग आम्ही वरच्या पातळीला कालिबंगा-2 (केएलबी -2) आणि खालच्या पातळीला कालिबंगा-1 (केएलबी-1) अशी नावं दिली.’

 
 
कालिबंगा- 2 मध्ये त्यांना सरस्वती िंसधू संस्कृतीच्या सगळ्या वैशिष्ट्यांंसह एक आयताकृती नगर मिळालं. पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण असे एकमेकांना काटकोनात छेदणारे रस्ते, त्यांना समांतर 20 द 20 द 10 सेंटीमीटर आकाराच्या विटांची बांधणी असलेल्या सांडपाणी पाणी वाहून नेणार्‍या आणि पावसाळी पाण्याचा निचरा करणार्‍या नाल्या, सर्वत्र सारख्या आकाराच्या भाजलेल्या विटांच्या िंभती, किल्ल्याची भक्कम तटबंदी, लाल रंगाची चितारलेली मातीची भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकारांचे मणी, मातीची खेळण्यातली चाकं असलेली पण बैल मोडलेली बैलगाडी, अग्निकुंड, बलिपीठ इत्यादी सगळ्या गोष्टी सापडल्या. आणि त्या खालच्या म्हणजे कालिबंगा-1 पातळीत सापडली एक त्याहूनही अद्भुत गोष्ट.
‘उत्खनन करता करता आम्ही इसवीसन पूर्व 3500 ते 2800 वर्षांपूर्वीच्या कालखंडाची पातळीपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला तिथे साधारण इसवीसन पूर्व 2800 वर्षांपूर्वी नांगरलेलं शेतच सापडलं. जगाच्या पाठीवर आजवर उपलब्ध झालेल्या पुराव्यात हे सर्वात जुनं आणि एकमेव नांगरटी केलेलं शेत आहे. 30 सेंटीमीटर अंतरावर पूर्व- पश्चिम नांगरलेले चर (सीता) आणि 190 सेंटीमीटर अंतरावर उत्तर दक्षिण नांगरलेले चर हे या शेताचं वैशिष्ट्य होतं. आश्चर्य म्हणजे, राजस्थानात आजही शेतांची नांगरणी अशीच केल्या जाते. अशा प्रकारच्या नांगरणीनंतर अंतर पिकं घेण्यात येतात. विशेषतः मोहरी आणि हरभर्‍याचं एकत्रित पीक घेण्यासाठी आजही याच प्रमाणात नांगरणी केल्या जाते.
 
याचा नेमका अर्थ असा की, या ठिकाणी इसवीसन पूर्व 2800 एक पूर्ण विकसित कृषीसंस्कृती इथे नांदत होती. बैल, उंट इत्यादी पशूंचा वापर करून अंतरपिकांसाठी योग्य अंतर ठेवत नांगरणी करून एकाच शेतातून दोन पिकं काढण्याचं कौशल्य इथे वसतीला असलेल्या लोकांनी हस्तगत केलं होतं.
 
शेतीचा शोध हा मानवी आयुष्याला कलाटणी देणारा, त्याला माणूस म्हणून नवी ओळख देणारा, त्याच्या प्रतिभेला आणि प्रज्ञेला जागृत करणारा आहे, याची ग्वाही सगळे समाज वैज्ञानिक देतात. त्यामागे सुपीक जमिनीची पारख, माणसाळलेली झुडुपं, िंसचनव्यवस्था,माणसाळलेले प्राणी (बैल/ रेडा/ उंट), औत नांगर हे तंत्रज्ञान आणि अपरिमित शारीरिक कष्ट या सार्‍यांचा समन्वय आणि व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. हे सारं इसवीसन पूर्व 2800 वर्षांपूर्वी या भूमीवर राहणार्‍या लोकांनी साधलं होतं.
त्याच प्रमाणे हरयाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातलं कुनाल नावाचं ठिकाण आहे. तिथे केलेल्या उत्खननातही सरस्वती िंसधू खोर्‍यात बहरलेल्या संस्कृतीची एक वस्ती होती, असे पुरावे आढळले आहेत. इथे राहणारी मंडळी कालिबंगाच्या लोकांशी नियमित व्यापार करत होती. या ठिकाणी सापडलेल्या वस्तू त्या काळच्या राजघराण्यातले लोक वापरत असावेत. या वस्तूत एक पूर्ण स्त्री वेश, एक आदिवासी शिरस्त्राण, तांब्याची भाल्याची आणि बाणाची टोकं, भूमितीय आकृती रेखलेले स्टेटाईटचे मणी, मातीची भांडी, मासेमारीचे गळ, दोन मुकुट, बांगड्या, चांदीचे मणी, गळ्यातलं सोन्याचं पदक, आणि लॅपिसलॅझुली या निळ्या रंगाच्या उपरत्नांचे 12 हजारांच्या वर मणी आणि बरंच काही. या भारतीय उपमहाद्वीप, मध्य आशिया आणि इराण म्हणजे तत्कालीन पर्शिया भागात आजवर सापडलेल्या सगळ्यात पुरातन वस्तू आहेत. हे सारं वरच्या स्तरावर सापडलं आणि त्या खाली उत्खननात सापडलं. किमान हडप्पा आणि मोहेंजोदारोपेक्षा किमान 1 हजार वर्ष वर्षांपूर्वीचं एक सुनियोजित शहर. राष्ट्रीय पुरातात्त्विक संग्रहालयचे मुख्य निदेशक डॉ. बी.आर. मणी यांच्या मते, हे शहर किमान 9 हजार वर्षे जुनं आहे, म्हणजेच तेव्हापासून भारतात नागरिकरण अस्तित्वात होतं आणि तेव्हापासून या भूमीतले लोक सुनियोजित नगरांचे वासी होते.
 
या उत्खननात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट पुरातत्त्वशास्त्रज्ञांना सापडली आणि ती म्हणजे तांबं गाळायची भट्टी. आसपास अशुद्ध तांब्याचे तुकडे आणि शुद्ध तांब्याच्या वस्तू मिळाल्या. धातुशास्त्राचे पहिले धडे भारतीयांनी ज्या गावी गिरवले, सिद्ध केले आणि त्यावर प्रभुत्व मिळवलं, ती ही जागा. याच धातुशास्त्राच्या जोरावर प्राचीन भारतीयांनी अनेक सहस्रकं आर्थिक समृद्धी अनुभवली.
 
या ठिकाणी आणखी दोन गोष्टी सापडल्या. हे देखील भारतीय उपमहाद्वीप, मध्य आशिया आणि इराण म्हणजे तत्कालीन पर्शिया भागात आजवर सापडलेले सगळ्यात जुने पुरावे आहेत. पहिला म्हणजे तांदूळ आणि दुसरा लसूण! विशेषज्ज्ञांच्या मते- सापडलेले तांदुळाचे अवशेष कदाचित रानटी तांदुळाचे असावेत. पण लसणाच्या वापराचे हे आजवरचे सर्वात जुने पुरावे आहेत.
एकूण भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीचे ताणेबाणे उलगडणारे, कालिबंगाचं नांगरलेलं शेत आणि कुणालची तांबं गाळायची भट्टीही भारतीयांची अभिमान स्थळं आहेत.