जाणता राजा
   दिनांक :17-Feb-2019
राष्ट्रजीवन हे नेहमीच अक्षुण्ण वाहणार्‍या जलौघासारखे असते. जसजसे कालचक्र गतिमान होत जाते तसतसे राष्ट्रजीवनसुद्धा आपले मार्गक्रमण करत जाते. कधी पराक्रमाच्या, वैभवाच्या, संपन्नतेच्या परमोच्च बिंदूवर; तर कधी नैराश्येच्या, हीनतेच्या, संकुचितपणाच्या खोल पातळीपर्यंत. फंदफितुरीच्या किडीने ग्रस्त, वाईट चालीरीतींनी त्रस्त आणि असामाजिक तत्त्वांच्या अत्याचारांनी आत्मविस्तृत, निद्रिस्त समाज स्वत:मधूनच निर्माण झालेल्या महापंडितांच्या विद्वत्तेने, अतिरथींच्या पराक्रमाने आणि नीतिवान समाजनायकांच्या मार्गदर्शनाने परम वैभवाला जातो. पण, राष्ट्रजीवन मात्र हिमनगांना ओलांडून पुढेच जाणार्‍या िंसधू नदीच्या धारावाही प्रवाहाप्रमाणे सातत्याने गतिमानच असते. भारतीय राष्ट्रजीवनसुद्धा असेच धारावाही राहिलेले आहे. उपरोक्त सर्व उतारचढाव भारतीय राष्ट्रपुरुषानेसुद्धा अनुभवले आहेत. दशाननासारखा कर्दनकाळ देवीदेवतांना भरडून काढत असताना, रामचंद्रांच्या अमोघ शस्त्रांनी उडवलेली राक्षस सेनेची दैना, अकरा औक्षहिणी उन्मत्त कौरव सेनेवर बाणांची बौछार करून विजयश्री खेचून आणणार्‍या पार्थाचा पराक्रम, दु:खात बुडालेल्या सामान्य जनतेला ‘अत्त दीप भव’चा संदेश देऊन आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे भगवान बुद्ध, सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी ‘वयं पंचाधिकम्‌ शतम्‌’ हा महामंत्र विसरलेल्या भारतीय घटक राज्यांना एका सूत्रात बांधून विशाल राष्ट्रपुरुषाला अक्षरश: जागृत करणारे चाणक्य; तसेच कुशाण आणि हूण भारताला भाजून काढत असताना त्यांच्या िंचधड्या उडविणारे (अनुक्रमे) विक्रमादित्य आणि यशोधर्मा. भारतीय संस्कृतीच्या अमृतरूपी धारेमध्ये सुस्नात होत्साते हे महापुरुष मरगळलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या समाजजीवनाला संजीवनी देणारे ठरले.
पण, याच भारतीय राष्ट्रपुरुषासाठी दु:स्वप्न ठरावा असा इतिहास अजून सुरू झाला नव्हता. त्याची पहिली झलक इ. स. 711 मध्ये दिसली. जेव्हा मोहम्मद-बिन-कासीमच्या रूपाने इस्लामी आक्रमणाची पहिली लाट भारतावर आदळली. आणि यानंतर मात्र एकापेक्षा एक क्रूर, निर्दयी सुलतानांची टोळधाडच उठली. गझनीचा महमूद, घोरी, ऐबक, बल्बन, खिल्जी, तुघलक, बाबर यांच्या बर्बर आक्रमणांनी भारताची, इथल्या जनमानसाची, संस्कृतीची दैना उडली. वर्षानुवर्ष, पिढ्यान्‌पिढ्या खपून तयार झालेल्या लेण्या, मंदिरे, शिल्पांच्या घणांच्या घावाखाली ठिकर्‍या ठिकर्‍या पडत होत्या. बेसुमार लूट, जाळपोळ, कत्लेआम, महिलांवरील पाशवी अत्याचारांनी प्रजा हतबल झाली होती. हे सर्व अत्याचार पाहिलेला कविराज भूषण (शिवरायांचा समकालीन) म्हणतो.
‘‘कासी हु की कला गई, मथुरा मसीद भई,
गर सिवाजी न होत तो सुन्नत होत सबकी.’’
 
650 वर्षांच्या सततच्या आक्रमणांनी समाज हादरला होता. स्वत:ची जमीन, घर, संपत्ती, एवढेच काय, तर अब्रूचे संरक्षण कसे करावे, या विवंचनेतच दिवस कंठित होता. सुलतानी जरब इतकी भयानक होती की, त्यांच्याविरुद्ध एल्गार तर सोडाच, पण बंडाची भावनादेखील मनात मूळ धरेनाशी झाली. आणि सुलतानच आता दिल्लीपती राहणार, कुणी भारतीय आता दिल्लीचा अधिपती होणार नाही, अशी पराभूत मानसिकता तयार होत होती. ‘दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा’ चे नारे भारतात दिले जात होते. समाज आत्मविस्मृत झालेला, विजीगीषू वृत्तीचा अभाव, संघटित शक्तीचा अभाव, जाती-पातीमध्ये विखुरलेला, अशा भयानक पार्श्वभूमीवर फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 दि. 19 फेब्रु. 1630 ला शिवनेरीवर जिजाऊसाहेबांच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. आईकडून सुरुवातीपासूनच मिळालेल्या स्वाभिमानाच्या बळावर शिवबा मोठे होत होते. वयाची 15 वर्ष पूर्ण होता होता शिवबांनी रायरेश्वरावर स्वराज्यनिर्मितीची शपथ घेतली. लहानग्या सवंगड्यांना हाताशी धरून भावी स्वराज्याची सेना उभी होत होती. 14-15 वर्षांच्या वयात जीवन-ध्येयाची स्पष्टता आलेली होती. शक्तीची आराधना सुरू झाली होती. ‘विनाशाय च दुष्कृताम्‌’ची वेळ आलेली होती. राजांनी सल्तनत-ए-आदिलशाहीविरुद्ध युद्धाचा शंखनाद केला आणि अल्पावधीतच त्यांनी दणकट आदिलशाहीचे कंबरडे मोडले. राजांचा नि:पात करण्यासाठी आलेल्या फत्तेहखान, अफजलखान, रुस्तमेजमान आदी सरदारांचा राजांनी धुव्वा उडविला. राजांनी एकाच वेळी आदिलशाही आणि मुघलशाहीविरुद्ध झुंज मांडली. कोकण, कल्याण-भिवंडी, जुन्नर, िंभगार अशा दशदिशांना स्वराज्याचे अश्व चौखूर उधळत होते. मराठी पराक्रमाने दोन्ही सत्ता भाजून निघत होत्या. शास्ताखानावरचा छापा व सुरतेवर धडकी भरविणार्‍या स्वारीने शिवरायांनी मोगलांचे जणू नाकच कापले. मोगलरूपी शूर्पणखेचा बदला घेण्यासाठी स्वत: मिर्झाराजे जयिंसह रणमैदानात उतरले. यावेळी शिवरायांनी दूरदर्शीपणा दाखवत शरणागती पत्करली. आग्र्याला जावे लागले. औरंगजेबाने धूर्तपणाने नजरकैद केले, तर राजांनी अभूतपूर्व नियोजन करून आपल्या संपूर्ण लवाजम्यानिशी स्वत:ची मुक्तता करून घेतली.

 
 
राजे स्वराज्यात आले. तीन वर्षं कुठलेही नवीन आक्रमण केले नाही. स्वत:ची शक्तिस्थाने अजून मजबूत केली. स्वराज्याची कमकुवत बाजू बलाढ्य केली. 4 फेब्रु. 1670 ला राजांनी मोगलांविरुद्ध दंड थोपटले. ‘मोहीम मांडली मोठी’ असे ज्याचे वर्णन करावे तसे राजे दख्खनवर तुटून पडले. मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने दक्षिणेवर तुफान उठवून दिले. राजांची घडक इतकी विलक्षण होती की, पुढच्या आठ वर्षांत मराठ्यांनी 260 किल्ल्यांवर भगवा फडकविला व 300 वर्षांनंतर पहिल्यांदा ‘तो’ सुवर्णक्षण दृष्टिपथात येऊ लागला, ज्याची सर्व जनता, प्राणी, पक्षी, प्रकृती आतुरतेने वाट बघत होते. तो क्षण सर्वांना सन्मानाची, स्थैर्याची हमी देणारा होता. तो क्षण ज्याला पकडण्यासाठी धरणी आतुरली होती. तो क्षण जो नियतीच्या हातून वारंवार निसटून जात होता. आज तो नियतीच्या हाती अलगद गवसणार होता. ज्येष्ठ शु. त्रयोदशी, 6 जून 1674 हाच तो दिवस जेव्हा 300 वर्षांनंतर पहिल्यांदाच कुणी िंहदू राजा िंसहासनाधीश्वर होत होता. िंहदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शिवराय छत्रपती झाले. बखरकार कृष्णाजी अनंत म्हणाले, ‘‘मराठा पातशाह येवढा छत्रपती जाला, गोष्ट काही सामान्य जाली नाही.’’ या राज्याभिषेकाच्या योगाने राजांनी प्राचीन भारतीय मूल्यांची पुनर्स्थापना केली. संपूर्ण सोहळा वैदिक पद्धतीने पार पडला. अनेक वर्षांची तुटलेली सांस्कृतिक नाळ पुन्हा एकदा जोडली गेली. राज्याभिषेकाची स्मृती सातत्याने प्रेरणा देत राहावी म्हणून राजांनी ‘राज्याभिषेक शक’ सुरू केला. त्या शकाला स्वत:चे नाव न देता राजांनी आपले ‘श्रीमंत योगीत्व’ जणू अबाधित राखले. प्राचीन भारतीय राज्यशास्त्रानुसार अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली. भाषेचे पावित्र्य कायम राहावे म्हणून मराठी भाषेवर अतिक्रमण करणारे फारसी, ऊर्दू शब्दांचे उच्चाटन केले. संस्कृतप्रचुर शब्दांचा ‘राज्यव्यवहारकोश’ रचून इस्लामचे सांस्कृतिक आक्रमणसुद्धा झुगारून दिले. शिवराय हे शेकडो वर्षांत पहिले भारतीय राजे ठरले, ज्यांनी स्वत:चे समर्थ आरमार उभे केले. या कामात त्यांनी ल्युई व्हिएगश या पोर्तुगीज माणसाचा उपयोग करून घेतला. मराठ्यांनी सागरी लढाईमध्ये ब्रिटिशांना (खारे) पाणी पाजले.
 
िंहदुपदपादशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांना सुरक्षेची पूर्ण हमी होती. महिलांवर अत्याचार केलेल्या अधिकार्‍यास राजांनी जबर दंड दिला. स्वराज्याची न्यायव्यवस्था अतिशय पारदर्शक आणि सदैव तत्पर होती. शेकडो वर्षांत ज्याचा कुणी विचारही केला नाही ते स्वराज्य राजांनी समर्थपणे उभे केले. सामान्य लोकांना संघटित करून असामान्य ध्येय गाठता येते. आपणही साम्राज्य उभारू शकतो आणि चालवू शकतो, हा विश्वास लोकांत उत्पन्न केला. सामान्य माणसात शिस्त, तत्त्वनिष्ठा हे गुण बाणवले. ज्यायोगे राजांच्या मृत्यूनंतरसुद्धा मराठी सल्तनत 138 वर्षे लढली. राजमुद्रेत वर्णिल्याप्रमाणे (‘मुद्रा भद्राय राजते’) राजांनी निर्मिलेले स्वराज्य हे अंत्योदयाला समर्पित होते. राजांनी शेतकर्‍यांची, कामगारांची, व्यापार्‍यांची सातत्याने काळजी घेतली. सारा पद्धतीचे नूतनीकरण, शेतजमिनीचे मोजमाप व करप्रणालीमध्ये क्रांतिकारी बदल केले. पूल, रस्ते, बंधारे बांधून स्वराज्याची घडी व्यवस्थित केली. शिस्तबद्ध, तत्त्वनिष्ठ समाजमन तयार केले. समाजासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करणार्‍या शिवरायांचा गौरव समर्थांच्या सिद्धहस्त लेखणीने ‘जाणता राजा’ या अतुलनीय शब्दांनी केला.
 
शतकानुशतके भारतीय जनमानस ज्या सूर्योदयाची वाट बघत होते, तो स्वराज्याच्या रूपाने साकार होत होता. देवगिरी, कर्णावती, वारंगळ, पाटलीपुत्र, इंद्रप्रस्थ अशा सर्व भंगलेल्या िंसहासनांच्या जखमा भरल्या होत्या. सर्व इस्लामी सत्ता आणि सत्ताधीशांसाठी कर्दनकाळ ठरावं आणि सर्व सज्जनांसाठी माहेरघर भासावं असं िंहदवी स्वराज्याचं सुवर्ण सिंहासन शोभत होतं. वयाच्या 15 व्या वर्षी घेतलली प्रतिज्ञा 44 व्या वर्षी पूर्ण होत होती. ही तीस वर्षे राजांनी त्यांच्या अफाट कर्तृत्वाने भारून टाकली होती. कुत्बशाहीला राजांनी आपल्या तेजाने दीपवून टाकले होते. आदिलशाही तर राजांनी स्वहस्ते भाजून काढली होती. मोगलांची मस्तीही राजांनी आपल्या पराक्रमाने जिरवली होती. इंग्रज तर राजांना वचकूनच राहू लागले होते. लहानपणी मातीचे किल्ले बनविणार्‍या शिवबांनी मोठेपणी या सर्व सत्तांना धूळ चारली. कुण्या कवीने लिहिले आहे-
‘सरित्पत्तीचे जल मोजवेना, माध्यानीचा भास्कर पाहवेना
मुठीत वैश्वानर बांधवेना, तैसा शिवाजी नृप िंजकवेना’
शिवाजीराजांच्या कर्तृत्वामागे त्यांचे निर्दोष नियोजन, धाडसी नेतृत्व, संघटन कौशल्य, जबर संस्थास्तम अनुशासन, कामे वाटून देण्याची व करवून घेण्याची कला, आर्थिक व्यवस्थापन आदी व्यवस्थापकीय गुणांचाही परिचय होतो.
अशा या देवदुर्लभ व्यक्तीचा शून्यातून विश्व निर्माण करतानाचा प्रवास तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य माणसाला आजही दीपस्तंभाप्रमाणे... नव्हे, शिवदीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. या चरित्रातून प्रेरणा घेत आपल्या आयुष्यात गुणांचा समुच्चय करत शून्यापासून दिग्विजयाकडे झेप घेऊ या. या राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी राजांस त्यांच्या जयंतिनिमित्त विनम्र अभिवादन अन्‌ मानाचा मुजरा!
- डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
..............