चंद्रपुरातील उच्चभ्रूवस्तीत देहव्यवसाय
   दिनांक :17-Feb-2019
-सरकारनगरातील सागीर सदनिकेवर धाड
-सहा महिलांसह एक पुरूष अटकेत
-स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 
 
चंद्रपूर, 
चंद्रपूर महानगरातील उच्चभ्रूवस्तीत सुरू असलेल्या देहव्यवसायावर धाड टाकून ६ महिलांसह एका पुरूषाला अटक करण्यात आली. ही कारवाई आज दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेनी केली. या कारवाईने महानगरात खळबळ उडाली आहे.
 
 
मागील काही दिवसांपासून मूल मार्गावरील सरकार नगरच्या सागीर सदनिकेच्या तिसर्‍या मजल्यावर देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना मिळाली होती. यावर पाळत ठेवून कारवाई करण्याचे निर्देश डॉ. रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख ओमप्रकाश कोकाटे यांना दिले होते. काही दिवसांपासून या सदनिकेवर पोलिसांची करडी नजर होती. आज रविवारी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका बनावट ग्राहकाला सदनिकेच्या तिसर्‍या मजल्यावर पाठविले.
 
 
 
देहव्यवसाय चालत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत देहव्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले असून, एक ५० वर्षीय महिला इतर महिलांना बोलावून येथे देहव्यवसाय चालवित होती. हा व्यवसाय चालण्यासाठी त्या ५० वर्षीय महिलेचा मुलगाही ग्राहक शोधण्याचे काम करत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
या कारवाईने सरकारनगरमधील उच्चभ्रूवस्तीत खळबळ उडाली असून, सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा व्यवसाय चालविणार्‍या महिलेसह अन्य ६ महिला व एका पुरूषावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे, वैरागडे, मुळेवार यांच्या पथकाने केली.