मुलाचे प्रेम बेतले आईच्या जीवावर.. मुलीचा भाऊ व वडिलाकडून महिलेचा खून
   दिनांक :17-Feb-2019
आर्वी,
सहा महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या मुलगा आणि मुलीचा पत्ता लागत नसल्याने संतापलेल्या मुलीचा भाऊ आणि वडिलाने मुलाच्या आईचा धारदार शस्त्राने वार करून खुन केला. ही घटना येथील भाईपूर पुनर्वसन येथे घडली. बेबी मेंढे (५०) असे मृत महिलेचे नाव आहे. मुलाचे प्रेम हे आईच्या जीवावर उठल्याने या घटनेने समाजमन पुन्हा एकदा सुन्न झाले.
 
 
 
बेबी मेंढे या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याच्या कवडगव्हान येथील रहिवाशी होत्या. ६ महिन्यापूर्वी बेबीच्या मुलाचे आणि गणेश काळे यांच्या मुलीचे प्रेम प्रकरण सुरू होते. या प्रेमात जातीचा भेदभाव येत असल्यामुळे दोघेही पळून गेले. त्यानंतर मुलाची आई बेबी यांना त्याचा त्रास सुरू झाला. त्यांचे घर जाळण्यात आले. भीतीने त्या गाव सोडून आर्वीत आल्या. ४ महिन्यापासून त्या पिंपरी पुनर्वसन येथे भाड्याने राहत होत्या.
 
बेबी मेंढे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा सूरज गेल्या ६ महिन्यांपासून गणेश काळे यांच्या मुलीला घेऊन पळून गेला. त्याचा पत्ताच लागला नाही. मुलगी कुठे आहे हेच विचारण्यासाठी काल (शनिवार) सायंकाळी गणेश काळे आणि त्याचा मुलगा उमेश आणखी एक जण, असे तिघेजण आर्वीत आले. सुरुवातीला जुना वाद मिटवा, असे सांगत चहापाणी करण्यास सांगितले.
 
त्यानंतर काही वेळाने मुलगा-मुलगी कुठे आहे, अशी विचारणा केली. यावेळी बेबी मेंढे यांनी मला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपी संतापले. त्यांनी घराबाहेर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक लोक जमले. एवढ्यातच उमेशने बाहेर आलेल्या बेबीवर घराच्या आवारातच धारदार शस्त्राने वार केला. त्यांना रक्तबंबाळ केले आणि पळ काढला. स्थानिक लोकांनी गणेश काळे याला पळताना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अमरावतीला नेत असताना वाटेतच बेबी मेंढेचा मृत्यू झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी खुनासह जातीचा वाद असल्याने ॲट्रॉसिटी सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसडीपीओ प्रदीप मैराळे हे करत आहेत.