पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक
   दिनांक :17-Feb-2019
लाहोर, 
 
अनोळखी हॅकर्सकडून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक करण्यात आल्याचे वृत्त आहे. सध्या वेबसाईट सुरू असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. हॅकर्सचा आम्ही शोध घेत असल्याचे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर वेबसाईट हॅक झाल्यामुळे हे भारतीय हॅकर्सचे काम असल्याचे पाकिस्तानमध्ये बोलले जात आहे.
 

 
 
 
पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तपत्रातील वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर झालेला सायबर हल्ला भारतातून करण्यात आला आहे. आयटी चमूने त्यावर नियंत्रण मिळवले आहे. परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट सध्या पूर्ववत काम करीत आहे. सध्या या सायबर हल्ल्यामागील सूत्रधाराचा शोध घेण्याचे काम आयटी चमू करीत आहे.
 
या प्रकरणावर बोलताना पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल म्हणाले की, वेबसाईट हॅक झाल्याची तक‘ार आम्हाला मिळाली आहे. दुसर्‍या देशातून वेबसाईटवर नियंत्रण ठेवले जात असल्याचे तांत्रिक चमूने सांगितले. सध्या वेबसाईट पूर्ववत काम करीत आहे.
 
पाकिस्तानमधून वेबसाईट सुरळीत सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला तरी, ऑस्ट्रेलिया, सौदी अरब, युके, नेदरलॅण्ड येथील वापरकर्त्यांनी वेबसाईट सुरळीत चालत नसल्याचा दावा केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईटवर सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे भारतीय हॅकर्सनी पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक केल्याचा संशय पाकिस्तानातून व्यक्त करण्यात येत आहे.