मोबाईल न खेळू दिल्याने १३ वर्षीय मुलीची आत्महत्या
   दिनांक :17-Feb-2019
मुंबई,
आईने मोबाईल खेळण्यास मनाई केल्याने, एका १३ वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
वाकोला परिसरात मालवणकर कुटुंब राहत आहे. त्यांच्या मुलीचे नाव अक्षया मालवणकर असे आहे. ती इयत्ता ७ वीच्या वर्गात शिकत होती. अक्षयाला तासनतास मोबाईवरचा वापर करण्याचे व्यसन जडले. घरात आई-वडील दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. त्याच्याकडे आपली मुले काय करतात हे पाहयला वेळ नसे. याचाच फायदा घेत अक्षया मोबाईलवर तासनतास वेळ खर्च करत असे.
 
 
ही बाब अक्षया हिच्या लहान भावाने आई-वडिलांनी सांगितली. तेव्हा आई रेवती हिने अक्षया हिची कानउघडणी करत मोबाईलपासून लांब राहण्यासाठी सांगितले. तू जर पुन्हा मोबाईलला हात लावता तर याची तक्रार तुझ्या वडिलांकडे करेन, असे सांगून आई रेवती आपल्या कामावर निघून गेली. आईने मोबाईल वापरण्यास मनाई केल्याचा राग अक्षयाच्या मनात होता. तिने घरात कोणी नाही हे पाहून खुंटीला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
हा प्रकार अक्षया हिचे वडिल घरी आल्यानंतर उघडकीस आला. तेव्हा त्यांनी तत्काळ हा प्रकार पोलिसांना कळवला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या मृत्यूची नोंद वाकोला पोलिसात करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला परिसरात पबजी गेम खेळण्यासाठी वडिलांनी ३७ हजारांचा मोबाईल फोन घेऊन न दिल्याने एका शाळकरी मुलाने गळाफास घेऊन आत्महत्या केली होती. अशा प्रकारच्या घटनेमुळे पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद वाढवावा. तसेच मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे होणारे मानसिक दुष्परिणाम किती घातक असतात, याबद्दल मुलांना माहिती देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.