स्मशान संताप... आणि नंतर!
   दिनांक :17-Feb-2019
पुलवामा येथील घटनेनंतर देशात स्मशान संताप पसरलेला आहे. 42 सैनिकांच्या चितांची कोट्यवधी भारतीयांच्या मनात पेटलेली आग सहजी विझणारी नाही. त्यात गतीमानता ही गरज असलेली आणि त्याचमुळे विवेक गहाण ठेवावाच लागणारी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे आणि केवळ भावनेच्या इंधनावरच धगधगत राहणारी समाज माध्यमे त्या आगीत भरच घालत आहेत. भारतीय जनमानसाचा संताप योग्यच आहे. अशावेळी संतत्वाचा विचार केलाच जाऊ शकत नाही. अगदी संतांनीही तेच सांगितले आहे. नाठाळाचे माथी हाणू काठी, असे तुकाराम महाराज म्हणाले होते आणि समर्थ रामदासांनी तर दासबोधात राज्यकर्त्यांनी शत्रूंशी कसे वागले पाहिजे, हे सांगितलेलेच आहे. त्यामुळे हा संताप देशभर पसरलेला आहे आणि तो वाढत जाणार आहे. त्याला वेगळ्या वाटा मात्र फुटू नये. हा देश एक आहे आणि राष्ट्र म्हणून अस्तित्वाचाच प्रश्न येईल तेव्हा आम्ही सगळे एक आहोत, हे आम्ही वारंवार दाखवून दिले आहे. आताही ते दिसते आहे, मात्र समाजमाध्यमांवर विशिष्ट राजकीय विचारांनी प्रेरित लोक नसते विचार या निमित्ताने पेरण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ते राष्ट्रद्रोहीच आहेत. अशा घटनांचा राजकारण आणि त्यातही निवडणुकीच्या सत्ताकारणाशी संबंध लावू नये, इतके साधे भानही दाखविले जात नाही. हा पोरकटपणा अगदी नको त्या पातळीवर पोहोचला आहे, हेही या निमित्ताने सखेद नमूद करावेसे वाटते.
 
 

 
 
हल्ल्याच्या सार्‍याच घटनांच्या मागे पाकिस्तान आहे, हे उघड आहे. भारतात सार्वत्रिक निवडणुका असताना नेहमीच पाकिस्तान असली आगळीक करत असतो. देशात मतदारांचे धार्मिक धृवीकरण झाले पाहिजे आणि अल्पसंख्य समाजाच्या मनात असुरक्षिततेची भावना प्रबळ झाली पाहिजे यासाठी हे केले जाते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात रालोआचे सरकार सत्तेत आल्यापासून आपले शेजारी चीन आणि पाकिस्तान अस्वस्थ आहेत. मोदींनी आंतरराष्ट्रीय राजकारणात जी आघाडी घेतली आणि भारताला केंद्रस्थानी आणले त्यामुळे विशषत: चीन अस्वस्थ आहे. चीनला जागतिक महासत्ता होण्याची घाई झाली आहे. त्यासाठी भारताची प्रगती रोखणे, यावरच त्यांचा भर आहे. अमेरिकेशी असलेली त्यांची स्पर्धा आता सुप्त राहिलेली नाही. या दोन बड्या देशांच्या स्पर्धेत आशिया खंड धगधगू लागलेला आहे. पाकिस्तान का केवळ मोहरा आहे. पुलवामा येथे हल्ला झाल्यावर निषेध व्यक्त करणार्‍या देशांत चीनचा क्रमांक अखेरचा लागतो. तीही शिष्टाचाराची अपरिहार्यता म्हणून त्यांची ही प्रतिक्रिया आहे. जैशचा म्होरक्या मसूद अझहरला पाकिस्तानने आश्रय दिला आहे. कंदहार विमान अपहरणानंतर त्याची सुटका करावी लागली होती आणि तेव्हापासून तो उघडपणे पाकिस्तानात फिरतो आहे. त्याला दहशतवादी घोषित करावे, अशी मागणी भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केली आहे. प्रत्यक्ष पाकिस्तानकडेही ती केली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या या मागणीला चीनचा उघड विरोध आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर त्याचमुळे भारताची ही मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. जैश ए महंमदच्या कारवाया सातत्याने सुरू आहेत. भारताविरोधात युद्धच जैशच्या माध्यमातून पाकिस्तान करतो आहे. संसदेवरील हल्ल्यापासून मुंबईवरील हल्ल्यापर्यंत मसूद अझहर मास्टर माईंड राहिला आहे. पठाणकोट आणि उरी येथील लष्करी तळावरही जैशनेच हल्ला केला होता. आता सार्वत्रिक निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर भारतात अस्वस्थता निर्माण करण्याचा हा पहिला प्रयत्न आहे. पहिला आहे, हे लक्षांत घेतले तर हा शेवटचा नाही, हेही तितकेच खरे आहे आणि मग तो पहिला आणि अखेरचा ठरावा यासाठी सापाचे तोंड ठेचलेच पाहिजे. मात्र, इलाज कायमचा हवा. अक्सीर हवा अन्‌ मग असा इलाज करताना अत्यंत शांत डोक्याने अन्‌ पूर्ण विचारांती तो करायला हवा. जनतेचा संताप अत्यंत स्वाभाविकच आहे; मात्र संताप बुद्धीशी जोडलेला नसतो. तो थांबायलाही तयार नसतो. त्यातूनच एकदम युद्धाची मागणी केली जाते आहे. युद्ध न करताही पाकिस्तानचा निकाल लावता येऊ शकतो. सरकार त्याच दिशेने काम करते आहे. युद्धाचा विचार अगदीच टोकाचा आणि अखेरचा आहे. चीनला तर पाकिस्तानच्या आडून भारताशी युद्ध करायचेच आहे. अर्थात अमेरिका आणि रशिया भारताच्या बाजूने असतील, हे आडाखे आहेत. या दोन्ही देशांशी भारताची युद्धे झालेली आहेत आणि त्यातून समस्या सुटल्या नाहीत, आणखी वाढल्या आहेत.
 
 
 
 
आता, भारताला आत्मरक्षणाचा पूर्ण अधिकार असून आमचा भारताला पूर्ण पािंठबा आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितले. त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले तसेच दहशतवादाविरुद्ध लढाईत भारताला पूर्ण पािंठबा असल्याचे त्यांनी सांगितले... ही राजनैतिक भाषा आहे. युद्धाचा विचार पािंठब्यांच्या अंदाजावर नाही तर स्वबळावरच करायचा असतो. अमेरिकाच नाही तर सारे जगच दहशतवादाचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, याच मताचे आहे आणि त्यावर सातत्याने मंथन सुरू आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद करा, अशी तंबी अमेरिकेने पाकिस्तानला दिली आहे. दहशतवाद्यांचा देश, अशी घोषणा करू, इथवर इशारा देऊन झाला आहे. मात्र अमेरिका चीनला या भाषेत बोलू शकत नाही. तरीही या सार्‍याच पृष्ठभूमीवर भारताच्या बाजूने अमेरिका कायम उभा राहिला आहे. आताही व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी मंत्री सारा सँडर्स यांनी, पाकिस्तानने दहशतवादी गटांना पािंठबा देणे व त्यांच्या देशातून कारवाया करण्यास मोकळे रान देणे या दोन्ही गोष्टी थांबवाव्यात. या भागात दहशतवाद व िंहसाचार पसरवण्याचा पाकिस्तानचा हेतू आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे अमेरिका व भारत यांच्यातील दहशतवादविरोधी सहकार्य आणखी मजबूत होईल हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे... असे स्पष्ट सांगितले आहे.
आता पाकिस्तानची कोंडी करण्याच्या दिशेने भारतानेही पाऊले उचलली आहेत. 1996 मध्ये पाकला बहाल केलेला ‘सर्वाधिक पसंत देशा’चा दर्जा रद्द करण्यात आला. हा दर्जा मिळालेल्या देशांना भारताकडून कस्टम ड्युटीमध्ये सवलत मिळते. ही सवलत रद्द करून पाककडून आयात होणार्‍या वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढवता येईल. यामुळे पाकच्या 48 कोटी 85 लाख डॉलर मूल्याच्या वस्तूंना फटका बसणार आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पाकचे भारतातील उच्चायुक्त सोहेल महमूद यांना समन्स बजावून पाचारण केले व त्यांच्याकडे तीव्र निषेध नोंदवून हल्ल्यामागील पाकचा सहभाग जगासमोर आणला. 1986 पासून ‘युनो’मध्ये प्रलंबित असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी परिषदेचा मसुदा संमत करण्यासाठी भारत जगातील सर्व देशांपर्यंत पोहोचणार आहे. पाकिस्तानचे पाणी तोडणे, हादेखील एक उपाय आहे. सोबतच पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याच्या आधी चीनचीदेखील कोंडी करावी लागणार आहे... एक मात्र नक्की की आता पाकिस्तानचा बंदोबस्त होईलच, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदींनी त्याबाबत खूप मोठा पल्ला गाठला आहे. सर्जिकल स्ट्राईक ही चाचणी होती. त्यानंतर उमटणारी प्रतिक्रिया किती शक्तिशाली असेल, याचा अंदाज आता आला आहे. शोक आणि संतापाच्या पृष्ठभूमीवर गुलजारांची त्रिवेणी कविता सूचक आहे-
कांटो की नुकीली तार पर किसने ये गीले कपडे टांग दीये
ऊसमेसे खून टपकता है और नालेमे बह जाता है
क्यूं फौजी की यह बेवा, रोज उसकी वर्दी धोती है