स्टार्टअपसाठी कार्यालयीन जागेची पाहणी
   दिनांक :18-Feb-2019
‘स्टार्टअप’ इंडिया अंतर्गत सरकार व व्यावसायिक या उभय स्तरांवर विविध स्वरूपातील वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपातील व्यावसायिक संकल्पनांना व्यवसायस्वरूपात मूर्त रूप देणार्‍या व त्याद्वारा व्यवसायवाढीमध्ये अल्पावधीतच व तुलनेने उल्लेखनीय योगदान देणार्‍या स्टार्टअप कंपन्यांना त्यांच्या गरजा व सोईस्कर वेळांनुसार, प्रसंगी अल्पावधीसाठी कार्यालयीन जागा व आवश्यक कार्यालयीन सेवा पुरविण्यासाठी एका स्टार्टअप कंपनीनेच पुढाकार घेतला असून त्यांच्या या प्रयत्नांचीच ही यशोगाथा-
राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील कॅनॉटप्लेस या व्यावसायिक परिसरात ‘श्वोव्ह:८’ या व्यावसायिक कार्यालयाची स्थापना या स्टार्टअप कंपनीने केली आहे. ‘श्वोव्ह:८’मध्ये सुमारे १२० कार्यालयीन कर्मचार्‍यांना बसून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्या दृष्टीने आवश्यक अशा आसनक्षमतेपासून पूरक-प्रशासनिक सेवासुद्धा पुरविण्यात आल्या आहेत.
 
‘श्वोव्ह:८’ या स्टार्टअपचे मार्केिंटग मॅनेजर रुसेल लोंगियम यांच्यानुसार, त्यांच्या स्टार्टअपसाठी कार्यालयीन स्थान व सेवा या संकल्पनेला सुरुवातीपासूनच चांगल्या प्रतिसादाला सुरुवात झाली. व्यवसायाच्या सर्वच क्षेत्रात स्टार्टअपचा मिळणारा वाढता प्रतिसाद, त्यांची व्यापक उपयुक्तता व मुख्य म्हणजे स्टार्टअप संस्थांचे छोटेखानी व नावीन्यपूर्णस्वरूप लक्षात घेता, या स्टार्टअप कंपन्यांची मर्यादित कालावधी व छोटेखानी स्वरूपातील कार्यालयीन जागा व सुविधा यांची पूर्तता करण्याच्या संकल्पनेलाच ‘श्वोव्ह:८’ या स्टार्टअपद्वारा मूर्तरूप देण्यात आले. या स्टार्टअपचे स्वरूप व त्याची सद्य:स्थितीतच नव्हे, दीर्घकालीन स्वरूपातील गरज लक्षात घेता, स्थापनाकाळापासूनच ग्राहक व गुंतवणूकदार या उभयतांकडून सातत्यपूर्ण व उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत गेला.

 
 
खास स्टार्टअप उद्योगांसाठी त्यांच्या नेमक्या गरजा व आवश्यकतांनुरूप बनविलेल्या या विशेष कार्यालयीन रचनांमध्ये मुख्य भर असतो तो संबंधित स्टार्टअपच्या कर्मचार्‍यांची संख्या, त्यांच्या कामाचे स्वरूप व त्यांचा कार्य-कालावधी यावर. याच्याच जोडीला कामाच्या ठिकाणी कार्यपोषक, सुरक्षित व त्याच वेळी स्टार्टअप आणि कर्मचार्‍यांना मूलभूत सुविधा पुरविणे आवश्यक असते. यातूनच केवळ २-३ कर्मचारीच असणार्‍या स्टार्टअपमधील अशा मर्यादित संख्येतील कर्मचार्‍यांना यामुळे आता आपण मोठ्या संख्येतील कर्मचार्‍यांसह व मोठ्या आकाराच्या कार्यालयात काम करीत असल्याची समाधानकारक अनुभूतीपण यानिमित्त मिळत आहे. यामुळे प्रगत अवस्थेतील एक वेगळी कार्य-संस्कृती विकसित होत आहे, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
 
स्टार्टअपसाठी को-वर्किंग या कार्यालयीन संकल्पनेमध्ये अशा स्टार्टअपद्वारा निवडक उद्योजक एकत्र येऊन आपल्या स्वतंत्र स्टार्टअपच्या माध्यमातून व्यवसाय-उद्योगांच्या विविध गरजा लक्षात घेऊन मध्यवर्ती ठिकाणी एकत्रित स्वरूपात कार्यालयीन व्यवस्था उपलब्ध करून देतात. अशा व्यवस्थेसाठी अर्थातच सुरुवातीचा निधी भांडवलस्वरूपात उपलब्ध होणे आवश्यक असते. यातून मूलभूत सुविधा उपलब्ध झाली की, त्याचा उपयोग विविध स्टार्टअपसाठी सशुल्कस्वरूपात केला जाऊ शकतो. शुल्काची ही आकारणी मुख्यत: वापराचा कालावधी, त्या दरम्यान उपस्थित असणारे कर्मचारी व त्या दरम्यान विविध सेवा-सोयींचा केला जाणारा वापर इ. वर अवलंबून असतो. त्यामध्ये टेबल-खुर्च्या, चर्चा कक्ष, स्टेशनरी, संगणक वा तत्सम कार्यालयीन उपकरणांचा उपयोग, कर्मचार्‍यांचे चहापाणी इ.वर अवलंबून असतो.
 
सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे, आज विविध ठिकाणी व विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या स्टार्टअप संस्थांची संख्या व कामाचा व्याप वाढत आहे. त्यांच्या कामाचा आवाका व व्याप वाढत आहे. त्यांच्या कामाचा आवाका व व्याप वाढत असला, तरी अशा स्टार्टअपच्या कर्मचार्‍यांची संख्या मात्र मर्यादित असते. अशा मर्यादित संख्येतील कर्मचार्‍यांसाठी व त्यांच्या लवचीक काम व कामाच्या तासांसाठी रीतसर कार्यालय थाटणे व्यावहारिक व शक्यपण नसते.
 
अशाच स्टार्टअपसाठी सामूहिक स्वरूपात व विविध स्टार्टअपच्या गरजांनुसार कार्यालयीन जागा उपलब्ध करून देण्याचे महनीय काम ‘श्नोव्ह:८’ या स्टार्टअपने सुरू केले आहे. राजधानी दिल्लीपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे लोण आता गुडगाव-गोव्यापर्यंतच नव्हे, तर अन्य व्यावसायिक शहरांपर्यंत पोहोचणे ही बाब या उपक्रमांची प्रासंगिकता व आवश्यकता दोन्ही सिद्ध करते.
 
-दत्तात्रय आंबुलकर