गोंडवाना विद्यापीठ निकालात मोठा गोेंधळ
   दिनांक :18-Feb-2019
-गोंडवाना विद्यापीठाकडून स्व-अध्यादेशाचीच पायमल्ली
-55 टक्क्याचा निकष असताना 50 टक्क्यावर शेकडो उत्तीर्ण
 
संजय रामगिरवार
 
चंद्रपूर,
आचार्य पदवी प्राप्त करण्याआधी त्यासंबंधीचे ‘कोर्सवर्क’ पूर्ण करावे लागते. गत तीन वर्षांपासून गोंडवाना विद्यापीठ ‘कोसवर्क’ची परीक्षा घेत आहे. या ‘कोर्सवर्क’चे अध्यादेश विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे. त्यात, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ५५ टक्क्याचे निकष पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे नमुद आहे. हे स्पष्ट असताना गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठ केवळ ५० टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करीत सुटले आहे. यात शेकडो विद्यार्थ्यांचा अकारण लाभ तर झालाच, पण अनेक विद्यार्थ्यांचे नुकसानही झाले आहे.
 
 
 
आचार्य पदवीच्या ‘कोर्सवर्क’साठीच्या प्रवेशप्रक्रियेची पध्दती, त्याच्या निकालाचे निकष आदी सविस्तर नोंद असलेले अध्यादेश क्रमांक ८७/२०१७ गोंडवाना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यातील १५ क्रमांकाच्या पानावर हा ‘कोर्सवर्क’ उत्तीर्ण करण्यासाठी ५५ टक्के गुण घेणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे नमुद आहे. परंतु, विद्यापीठ त्यातील दोन पेपर्समध्ये केवळ ५० टक्क्यांचा निकष लावून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण करीत आहे.
 
‘रिसर्च मेथडालॉजी’ हा १०० गुणांचा पेपर असून, त्यात ५० टक्के म्हणजे, ५० गुण आणि ‘कॉम्पुटर अप्लीकेशन’ या ५० गुणांच्या पेपरमध्ये २५ गुणांचा निकष विद्यापीठाच्या अधिकार्‍यांनी स्वत:च ठरवला आहे. या दोन पेपर्समध्ये एकूण ७५ गुण मिळाल्यास त्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्याची अनोखी पध्दत गेल्या दोन-तीन वर्षांपासून विद्यापीठ अवलंबत आहे. खरे तर, अध्यादेशातील ५५ टक्क्यांच्या निकषानुसार, या दोन पेपर्समधील एकूण गुण ८३ आल्याशिवाय कोणताच विद्यार्थी उत्तीर्ण व्हायला नको. पण ७५ गुण मिळाले, की विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्याची परंपरा विद्यापीठाने तीन वर्षांपासून कायम ठेवली आहे.
 
विद्यापीठाच्या अजब निकषामुळे जवळपास ७९ विद्यार्थी असे आहेत की, ज्यांनी या दोन पेपर्समध्ये एकूण गुण ७५ च्यावर घेतले असले, तरीही ते अनुत्तीर्ण झाले आहेत. अशाच काही विद्यार्थ्यांनी या अध्यादेशाचा आणि निकालाचा अभ्यास करून प्रस्तुत प्रतिनिधीकडे तक्रार केली आहे. २०१६ ते २०१८ पर्यंतच्या परिक्षेच्या निकालात विद्यापीठाने अध्यादेशाचे निकष न पाळता शेकडो विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. जमीन खरेदी आणि गुणवाढ घोटाळ्यानंतर गोंडवाना विद्यापीठाच्या या नव्या गोंधळाने शिक्षण क्षेत्र कशी प्रतिक्रिया देते, तेच आता बघायचे आहे.
 
 अन्य दोन पेपर्सचे गुण ‘कोर्सवर्क’ केंद्र देते
-डॉ. अनिल चिताडे यांचे स्पष्टीकरण
 सदर गोंधळाबाबत विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, याबाबत एक वेगळे ‘नोटीफिकेशन’ असून, त्यात ‘रिसर्च फिलासॉफी अ‍ॅण्ड फाऊंडेशन’ आणि ‘स्पेसिफिक डोमेन रिसर्च अ‍ॅण्ड सेमिनार’ असे अन्य दोन पेपर्स असून, त्याचे गुण नंतर कोर्सवर्कच्या केंद्राकडून गोपनीय पध्दतीने येते. ते धरून 55 टक्के होत असेल. डॉ. चिताडे यांनी हे स्पष्टीकरण दिले असले, तरी या दोन विषयांचा उल्लेख आणि त्याची गुणपध्दती अध्यादेशात नाही. शिवाय, चार पेपर्स असतील, तर केवळ दोन पेपर्सचे गुण ५० टक्क्यावर जाहीर करून तसा निकाल का दिला जातो, याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मिळाले नाही.