आम्ही भारतवासी एक आहोत...
   दिनांक :18-Feb-2019
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात आमचे 42 जवान शहीद झाल्यानंतर, संपूर्ण देशात दु:खाची आणि सोबतच संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. सरकारने पाकिस्तानला उघड शब्दांत सुनावले आहे की, तुम्ही फार मोठी चूक केली आहे, त्याची तेवढीच मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. या घटनेनंतर देशात एकजुटीचे अभूतपूर्व प्रदर्शन पाहायला मिळाले. जागोजागी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले आणि शहीद जवानांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करण्यात आल्या.
 
श्रीनगरहून विशेष विमानाने आमच्या शहीद जवानांची फुले जेव्हा दिल्लीच्या पालम विमानतळावर आली, तेव्हा त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्वत: पंतप्रधान, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन्‌, गृहमंत्री राजनाथिंसह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरिंवद केजरीवाल हेही उपस्थित होते. एक चांगला संदेश यातून गेला. दुसर्‍याच दिवशी गृहमंत्री राजनाथिंसह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही देश सरकारच्या पाठीशी असल्याची ग्वाही सर्वच पक्षाच्या नेत्यांनी दिली. पाकिस्तानला दिलेला हा संदेशही, भारताच्या एकजुटतेचा परिचय देणारा होता. पुलवामा हल्ल्यानंतर अनेक देशांच्या राजदूतांनी परराष्ट्र मंत्रालयात धाव घेऊन, दहशतवादी लढ्याच्या भारताच्या या प्रयत्नात आम्ही सर्व जण भारतासोबत आहोत, असे भरीव आश्वासन दिले. केवळ भारतच नव्हे, तर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांच्या विरोधात संपूर्ण जगही एकजुटीने उभे आहे, असा संदेश यातून पाकिस्तानात गेला. या सार्‍या घटना आगामी काळात भारताकडून होणार्‍या दहशतवादविरोधातील कारवाईला मोठे बळ देणार्‍या आहेत.
 
 
 
देशाचे मानस काय आहे, हे आपण गेल्या दोन दिवसांपासून अनुभवतच आहोत. जनतेत आक्रोश आहे. बदला घ्या, असा एकमुखी सूर संपूर्ण देशात उमटला आहे. सरकारनेही बदला घेण्याचा निर्धार केला आहे. अशा या संतप्त वातावरणात शहीदांच्या कुटुंबीयांसाठीही सारा देश धावून आल्याचे दृश्यही मनाला सुखावणारे आहे.
 
सूरतच्या एका व्यापार्‍याने आपल्या मुलीच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम रद्द करून ११ लाख रुपये पुलवामातील शहीदांच्या कुटुंबीयांसाठी दिले. शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त संस्थेने शहीद कुटुंबीयांच्या मदतीसाठी दोन कोटी ५१ लाख रु. दिले. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून ५१ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. पुण्यातील क्वीन मेरी संस्थेकडून २५ लाखांची मदत मिळणार आहे. अभिनेता अमिताभ बच्चनने प्रत्येक शहीदाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. रिलायन्स फौंडेशनने प्रत्येक शहीद परिवाराच्या कुटुंबीयांचे पालनपोषण, पाल्यांचे शिक्षण, नोकरी आणि वैद्यकीय उपचार देण्याची घोषणा केली आहे.
 
शहीदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आधीच अस्तित्वात असलेल्या ‘भारत के वीर’ या वेबसाईटवर पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मदतीचा एवढा ओघ वाढला की, ती वेबसाईटच क्रॅश झाली. छत्तीसगडमधील नक्षल चकमकीत शहीद झालेल्या सीआरपीएफच्या १२ जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी ही वेबसाईट अक्षय कुमार याच्या कल्पनेतून गत वर्षी साकारली होती. या वेबसाईटचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री राजनाथिंसह यांच्या हस्ते झाले होते. ही वेबसाईट पुढे तशीच सुरू ठेवण्यात आली आणि अजूनही ती सुरूच आहे. अशा कितीतरी संस्था, संघटनांनी शहीद परिवाराच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी उदार हस्ते मदत केली आहे. मदतीचा हा ओघ सुरूच आहे.
 
भारतीयांच्या अंत:करणात आपल्या जवानांविषयी, त्यांच्या कुटुंबीयांविषयी किती प्रेम भरले आहे, त्याची ही प्रचीती. देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आमच्या शूरवीर जवानांना दिलेला हा संदेश आहे. तुम्ही लढत असताना, तुमच्या कुटुंबीयांची काळजी करू नका, त्यासाठी देश उभा आहे, हा तो संदेश. पण, काही समाजकंटकांनी पुलवामातील शहीदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी खोटी वेबसाईटही काढली आहे. अशा अनेक वेबसाईटचा सध्या पूर आला असून, जनतेला सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
सारा देश दु:खसागरात बुडाला असताना, आमच्या देशातील काही वाहिन्यांनी जणू काही घडलेच नाही, ही एक साधारण हल्ल्याची घटना आहे, असेच स्वरूप टुकडे गँगचे समर्थन करणार्‍या पत्रकारांनी दिले. देशातील अग्रगण्य इंग्रजी दैनिकांनी तर आपल्या मथळ्याचा प्रारंभ, हा हल्ला पाकिस्तानने केल्याचा भारताचा आरोप या शब्दांनी आपल्या बातमीच्या मथळ्यातून केला. या दैनिकाची वाचकांनी अशी काही झाडाझडती घेतली की, अनेकांनी हे वृत्तपत्र उद्यापासून आमच्या घरी पाठवू नका, असे जाहीर केले. त्यांनी ‘किल्ड’ असा शब्द वापरला. शहीद शब्द वापरण्याची त्यांना लाज वाटली. अन्य इंग्रजी दैनिकांनीही किल्ड असाच शब्द वापरला. टुकडे गँगच्या काही पत्रकारांनी आपल्या सरकारलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा उपद्व्याप केला. चूक झालीच कशी, असाच प्रश्न त्यांचा होता. जगात गुप्तवार्ता यंत्रणेच्या बाबतीत अमेरिका क्रमांक एकवर असताना, त्याच्याकडूनही चूक झाली आणि अमेरिकेच्या ट्विन टॉवर्सवर हल्ला झाला होता.
 
आपल्या देशातील इंग्रजी आणि मोजक्या हिंदी वाहिन्या सरकारविरुद्ध गरळ ओकण्यात धन्यता मानत आहेत. याचा एकच इलाज आहे. या वाहिन्या पाहणे बंद करणे आणि अशी वर्तमानपत्रे खरेदी न करणे. जी प्रसिद्धिमाध्यमे देशासोबत नाहीत, त्यांना असाच धडा शिकविण्याची गरज आहे. त्याचा प्रारंभ वाचकांकडूनच झाला, हे बरे झाले. सध्या सरकारपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शहीदांच्या बलिदानाचा बदला घेण्याची तयारी एव्हाना सुरूही झाली असेल. आमच्या लष्कराला कोणत्या वेळी, कुठे आणि त्याचे स्वरूप काय राहील, हे ठरविण्याचा संपूर्ण अधिकारही बहाल करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. सीआरपीएफनेही म्हटले आहे, भूलेंगे नही, छोडेंगे नही...
 
संपुआच्या काळात दहशतवाद्यांनी राजपुताना रायफल्सचा आमचा एक जवान हेमराज याचे शिर कापले होते. त्याचा बदला घेण्यासाठी त्या वेळी राजपुताना रायफल्सच्या जवानांच्या संतापाचा एवढा उद्रेक झाला होता की, आम्ही पाकिस्तानात जाऊ आणि अतिरेक्यांना गोळ्या घालू, अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली होती. ते कुणालाही जुमानण्याच्या स्थितीत नव्हते. अखेर वरिष्ठांनी लगेच धाव घेऊन महत्प्रयासाने त्यांना शांत केले. तात्पर्य एवढेच की, ज्याप्रमाणे आमच्या एकेक जवानाच्या बलिदानाप्रती आमच्या तळपायाची आग मस्तकात जाते, त्यापेक्षा कितीतरी पटीने संबंधित बटालियन वा रेजिमेंटच्या सैनिकांच्या मनात बदल्याच्या आगीच्या ज्वाळा धगधगत असतात. आगामी काही दिवसांत ही आग शांत करण्याची संधी येऊ घातलेली आहे.
 
आमचा जवान इतका शूरवीर आहे की, तो पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचा खात्मा करण्यास मागेपुढे पाहात नाही. आमच्या लष्कराच्या बलिदानाच्या कहाण्या इतक्या आहेत की, त्या फक्त लष्कराच्या ग्रंथालयातच जाऊन वाचता येऊ शकतात. हजारो पुस्तके आमच्या जवानांच्या शौर्याने ओतप्रोत भरलेली आहेत. आजच्या या नाजूक घडीच्या वेळी सारा देश एकजुटीने उभा आहे. तो यापूर्वीही होता. १९६५, १९७१ आणि कारगिलच्या वेळीही हे दृश्य देशाने अनुभवले आहे. त्याचे पावित्र्य कायम राखण्याची जबाबदारी आता जनतेची, माध्यमांची आणि राजकीय नेत्यांची आहे. ही एकजूटच शत्रूला नमवू शकते, हे कुणीही विसरता कामा नये!