विदर्भातील पहिली चारा छावणी रासेगावात
   दिनांक :18-Feb-2019
चांदूर बाजार,
संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी वातावरण निर्माण होत आहे. या दुष्काळी परिस्थितीची सर्वात जास्त झळ पशु-प्राण्यांना बसते. चारा-पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात पशुधन मरण पावते किंवा विकल्या जाते. चारापाण्या अभावी शेतकरी, पशुपालक, पशुधन विकतो. त्यावर उपाय म्हणून सामाजिक बांधिलकी लक्षात घेता धर्मदाय आयुक्त कार्यालय व शिवशक्ती गौरक्षण सेवाभावी संस्था, रासेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील पशुधन व पोलिस प्रशासनाद्वारे पकडलेल्या जनावरांसाठी चारा छावणी शिबिर उघडण्यात आले. या चारा छावणी शिबिराला मुंबई येथील सुरभी कुटीर उद्योग फाऊंडेशन ही संस्था मदत करणार आहे.
 
 
 
महाराष्ट्र शासनाने केवळ मराठवाड्यात पाच जिल्ह्यात चारा छावणीची अनुमती दिली. या चारा छावणीचे उद्घाटक म्हणून अमरावतीचे धर्मदाय सहआयुक्त अजय राजंदेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त पशुसंवर्धन डॉ. विजय भोजने, विशेष अतिथी अचलपूरचे तहसीलदार निर्भय जैन, प्रमुख अतिथी राहुल मामू, धर्मदाय आयुक्त अमरावती डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा आयुक्त पशुसंवर्धन डॉ. राधेश्याम बहादुरे, श्री अंबादेवी संस्थेचे सचिव रवींद्र कर्वे, विजय शर्मा, फादर जोश उपस्थित होते.
 
याप्रसंगी निर्भय जैन यांनी आपल्या भाषणात गोवंशाच्या गोबर व गोमुत्रापासून पंचगव्य उत्पादने तयार करुन विक्री करावी, असे आवाहन केले. राजंदेकर म्हणाले, सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने या गोशाळेला मदत करावी. देशी गाईच्या ए वन व ए टू दुधाचे महत्व विदेशाने जाणले आहे. डॉ. भोजने यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित सर्व पशुपालक व शेतकर्‍यांना दिली. या प्रसंगी डॉ. शेवतकर व जे. आर. पठाण यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयातील एस. एन. दुतोंडे, निलेश करलुके, उमेश लुंगे, आर. एम. गुल्हाने तसेच शिवशक्ती गोरक्षणचे प्रमोद लांडे, विनायक गाडवे, रासेगाव या गावातील रामेश्वर बोबडे, मुन्ना शळके, डोळस, अरविंद बोबडे, अविनाश गोंधळे, मदन झोड, लक्ष्मणराव नकाते यांनी परिश्रम घेतले.