ख्रिस गेलची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
   दिनांक :18-Feb-2019
मुंबई,
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्ध आगामी मालिकेआधी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकानंतर ख्रिस गेल एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
 
मोठ्या विश्रांतीनंतर ख्रिस गेलचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून किंगस्टन ओव्हल येथे सुरुवात होत आहे. या मालिकेत ख्रिस गेलला वेस्ट इंडिज संघात स्थान मिळाले आहे. ख्रिस गेल वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये यादीत आघाडीवर आहे.
 
 
वेस्ट इंडिजकडून खेळताना माजी कर्णधार ब्रायन लारानंतर सर्वाधिक धावा ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने आतापर्यंत २८४ एकदिवसीय सामन्यात ९७२७ धावा केल्या आहेत. यामध्ये २३ शतके आणि ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर १६५ बळी आहेत. तर लाराने एकदिवसीय कारकिर्दीत १०४०५ धावा ठोकल्या आहेत.
 
ख्रिस गेलने १९९९ मध्ये भारताविरोधात एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. त्याने २०१५ क्रिकेट विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध २१५ धावांची खेली केली होती.