भाजपा-शिवसेनेत युतीची घोषणा
   दिनांक :18-Feb-2019
मुंबई,
गेल्या काही दिवसांपासून एकमेकांविरोधात संभाषणे करणाऱ्या शिवसेना आणि भाजपाने अखेर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाध्यक्ष अमित शाह उपस्थित होते. युतीच्या अंतिम चर्चेसाठी मित्रपक्षाला पटक देंगे म्हणणारे भाजपा अध्यक्ष अमित शाह आज मातोश्रीवर आले होते. शिवसेना-भाजपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील जाहीर करण्यात आला. लोकसभेच्या ४८ पैकी २५ जागा भाजपा तर २३ जागा शिवसेना लढवणार आहे. तर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी १४४ जागा लढवतील.
 
 
उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधी सोफिटेल हॉटेलमध्ये अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासह चर्चा केली. त्यानंतर ही नेते मंडळी युतीच्या चर्चेसाठी मातोश्रीवर पोहोचली. याआधी उद्धव यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला संजय राऊत, चंद्रकांत खैरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. युती झाल्यानंतर नेमकी रणनिती काय असणार, जनतेसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार, याबद्दल या दोन्ही बैठकांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेनेने सातत्याने मोदी सरकारवर टीका करताना स्वबळाचा नारादेखील दिला होता, त्यामुळे आता शिवसेना मतदारांना कशी सामोरी जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपाने युती करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्चित झाल्यानंतर शिवसेना-भाजपाने लगेच युतीचा मुद्दा निकाली काढला. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास नुकसान होत असल्याचा अंदाज अनेक सर्वेक्षणांमधून समोर आला होता. त्यामुळेच या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.