एसआरपीच्या जवानाकडे सहा लाखांची घरफोडी
   दिनांक :19-Feb-2019
नागपूर,
पत्नीच्या भेटीसाठी गडचिरोली येथे गेलेल्या राज्य राखीव पोलिस बलाच्या शिपायाकडे घरफोडी करून अज्ञात चोरांनी ५ लाख ९५ हजाराचा ऐवज चोरून नेला.
 
सचिन युवराज मेश्राम (३८) रा. रामजी आंबेडकर चौक, कंट्रोलवाडी असे या शिपायाचे नाव आहे. सचिन मेश्राम हे राज्य राखीव पोलिस बलात कार्यरत असून त्यांची पत्नी गडचिरोली पोलिस दलात आहे. मेश्राम हे नागपूरला, तर पत्नी गडचिरोलीत राहते. मुले वडिलांकडे नागपूरला राहतात. मेश्राम यांनी नवीन घर खरेदी केल्याने त्यांनी घराच्या रजिस्ट्रीसाठी ५ लाख ८० हजार रुपये घरात आणून ठेवले होते.
 
दरम्यान, १६ फेब्रुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास मुलांना घेऊन ते पत्नीला भेटण्यासाठी गडचिरोली येथे गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरांनी मुख्य दाराचा कुलूपकोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख ५ लाख ८० हजार रुपये चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वाडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.