धर्मयुद्ध आणि सारथी...
   दिनांक :19-Feb-2019
एक हल्ला केल्यावर थोडा अदमास घेण्यासाठी वाट बघायची, उसंत घ्यायची, अशी सहसा दहशतवादी किंवा हल्लेखोरांची नीती असते. सापाने दंश केल्यावर त्याची हलाहलाची पिशवी रिकामी होते आणि त्यालाही क्षीणत्व येते. त्यामुळे दंश केलेला सर्प सुस्त पडून असतो. तसेच दहशतवादी किंवा हल्लेखोरांचेही होत असावे... मात्र, या गृहीतकाला, पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या वर्तनाने, आता त्यांनी वेगळा पवित्रा घेतला असल्याचे दिसून येत आहे.
 
भारताची तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, नियंत्रण रेषेजवळ तिसर्‍याच दिवशी स्फोट झाला अन्‌ त्यात चित्रेशिंसह बिष्ट हे मेजर शहीद झाले. सोमवारी पुन्हा चार जवान शहीद झाले. पुलवामाजवळच हे अतिरेकी दडून बसले असल्याचे कळताच, लष्कराने कारवाई केली आणि त्यात चार जवान शहीद झाले. इतका मोठा हल्ला केल्यावर आता तितकेच किंबहुना त्यापेक्षाही जोरदार उत्तर दिले जाईलच, या शक्यतेचा विचार करता, सावध आणि सुरक्षित माघार घेण्याची नीती असेल, असे वाटत असताना छोटेमोठे धक्के देतच राहायचे, ही कपटनीती दिसते आहे. त्यात भारतीय जनमानस पेटले असताना आणि सूडाची भावना पराकोटीला गेली असताना, पाकिस्तानने जगासमोर दाखवायला काही गोष्टी केल्या. अर्थात, ते शिष्टसंमत असे उपचारच आहेत. त्यात आस्था किंवा भीती नाही.
 
 
 
दहशतवाद्यांनी मात्र आक्रमकपणा कायम ठेवलेला आहे. त्यात लष्करानेदेखील कारवाई सुरू केली आहे आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात जैशचा कमांडर कामरानचा समावेश आहे. ही, जनक्षोभ थोडाफार शांत करणारी बाब ठरू शकते. अर्थात, भारत सरकारने पाकिस्तानची राजकीय, आर्थिक कोंडी करणे सुरू केले आहेच. जनतेला युद्ध हवे आहे. पाकिस्तानला कायमचा संपवूनच टाका, अशी भाषा केली जात आहे. या भावना समजून घ्याव्या अशाच आहेत आणि त्याचसोबत भावनांचा हा भर ओसरला की, मग शांतपणे हीच मंडळी हाही विचार करणार आहेच की, एकदम युद्ध हा पर्याय नाहीच.
पाकिस्तानने कायम काश्मिरात अशांतता राहावी यासाठी प्रयत्न केले आहेत. आधीच्या थेट युद्धांचा परिणाम पाहिला असल्याने अतिरेक्यांच्या मार्फत छुपे युद्ध त्यांनी आरंभले आहे. आधीच्या सरकारांनी एकीकडे पाकिस्तानशी चर्चा करत असताना, काश्मिरी फुटीरतावाद्यांशीही संवाद कायम ठेवला होता.
 
तरीही दशहतवाद्यांच्या मार्फत सीमा धगधगती ठेवण्याची कूटनीती पाकिस्तानने सोडली नाहीच. गेल्या चार-साडेचार वर्षांत संवादासोबतच आक्रमण, हे धोरण ठेवण्यात आले. त्यामुळे काश्मिरात अतिरेक्यांची संख्या कमी झालेली आहे. अगदी पाच-सातशे अतिरेकी आता काश्मिरात आहेत. आधी देशात कुठेही अतिरेकी हल्ले केले जायचे. मुंबई, पुणे आणि दिल्लीच नव्हे, तर संसदेपर्यंत ते पोहोचले होते. गेल्या चार-पाच वर्षांत अतिरेकी कारवाया केवळ काश्मीरभोवती एकवटल्या आहेत. एकतर त्यामागे भारताने घेतलेला आक्रमक पवित्रा आहेच, पण सोबतच देशाच्या इतर भागांत हल्ले केल्याने तितका परिणाम नाही साधत आणि भारतीय मुस्लिम समाजही त्यात बळी जातो, हादेखील त्यामागचा विचार आहे.
 
अर्थात, भारतीय मुस्लिमांबद्दल पाकिस्तानला फार कळवळा किंवा प्रेम नाहीच; पण त्यांना आपल्या कारवायांतून भारतीय समाजाचे ध्रुवीकरण साधायचे आहे. आपसात संशयाचे वातावरण आणि शीतयुद्ध सुरू राहिले की, मग भारतात वेगळ्याने काही करण्याची गरज उरत नाही, हाही विचार त्यामागे आहे. परत स्थानिकांची सहानुभूती गमावली तर मग त्यांचे सहकार्य आणि खास म्हणजे त्यांचा वापर करता येणार नाही, यासाठीही काश्मिरात सारी ताकद पाकिस्तानी दहशतवाद्यांनी एकवटली आहे. त्यात मग त्यांनी काश्मिरात सैन्याच्या गोळ्यांचे बळी ठरण्यापेक्षा पुन्हा स्थानिकांचाच वापर करणे सुरू केले आहे. त्यांना फुटीरतावादी खतपाणीच घालत आहेत. काश्मिरियतच्या नावाखाली काश्मिरी जनतेत भारत सरकारविरोधात असंतोष धगधगत ठेवायचा, हे फुटीरतावाद्यांचे कारस्थान आहे. त्यांना स्वतंत्र काश्मीर हवा आहे आणि एकदा त्यांनी समजा साध्य केले, तर पाकिस्ताननंतर तो गिळंकृत करेल, हेही नक्कीच आहे. ‘पहले मुलाकात, फिर बात और फिर नही माने तो लात!’ अशी सहसा नीती असते. मात्र, भारताने गेल्या काळात ‘लात’पासूनच सुरुवात केली आहे. त्याचा परिणामही चांगला झाला, मात्र दहशतवाद्यांनी नीती बदलली.
 
त्यांनी स्थानिक तरुणांमधील अस्वस्थतेचे भांडवल केले. त्यांच्या रिकाम्या हातात बंदुका दिल्या. परवा पुलवामात झालेला हल्ला हा अशाच अतिरेकी झालेल्या स्थानिक तरुणाच्या मार्फतच करवून घेण्यात आला आहे. पाकी दहशतवादी मारले गेले, तर त्यांच्या संदर्भात काश्मिरींना सहानूभूती नसते, मात्र जन्नतच्या नावाखाली ब्रेनवॉश करण्यात आलेला काश्मिरी तरुण लष्कराच्या कारवाईत मारला गेला, तर काश्मिरींच्या भावना दुखावतात. मग त्याचा बदला घेण्यासाठी त्यांचा आणखी एक भाऊबंद बंदूक हाती घेतो. पाकिस्तानात आश्रयाला असलेले, दहशतद्यांची सूत्रे हलविणारे अशी सूत्रे हलवीत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी अतिरेकी मारले जात नाही, स्थानिकांचा वापर करून घेण्यासाठी सातत्याने काश्मिरी तरुणांना रसद मिळत राहते, काश्मिरात आग कायम राहते, भारताबद्दल दुरावा आणखी वाढतो आणि आपल्याच लेकरांवर कशी गोळी चालवायची, या मुद्याशी भारतीय लष्कराच्या बंदुका मवाळ होतात... असे अनेक फायदे या नव्या कूटनीतीचे आहेत.
 
काश्मिरी तरुणांच्या हातात थेट बंदुका देण्याच्या आधी त्यांच्या हातात दगड दिले जातात. थेट अतिरेकी प्रशिक्षणासाठी निवड आणि दगडवाले अशा दोन गटांत ही विभागणी करण्यात आली आहे. दगड मारले तरीही लष्कराने काहीच करायचे नाही. अगदी सैनिकांच्या अंगावर थुंकून हे तरुण अत्यंत अस्मिताभंग करणार्‍या शिव्या घालतात. त्यांच्यावर काहीही कारवाई केली, तर मानवाधिकारवाले लगेच त्यावर आक्षेप घ्यायला सुरुवात करतात. त्याची छायाचित्रे आणि चलचित्रेही समाजमाध्यमांवर फिरविली जातात. भारत लष्करी दबवातून काश्मिरींना धाकात ठेवतो आहे, असा कांगावा करायला पाकिस्तानी सरकार आणि पाकधार्जिणी माध्यमे तयारच असतात. त्यामुळे एकीकडे काश्मिरींना नीट हाताळत असतानाच, पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याची नीती असू शकते.
 
यातला पहिला विषय जास्त चांगला आणि भारतासाठी महत्त्वाचा आहे. आपल्या भरकटलेल्या मुलाला आधी सामान्य करणे. त्याला नीट मार्गाला लावणे आणि नंतर ज्याने त्याला भटकवला होता त्याला समज देणे, ही नीती असते. पाकिस्तानवर एकदम हल्ला करून भाबड्या जनक्षोभाला सलामी देता येणारच नाही. त्यासाठी जगाचाही विचार करावाच लागत असतो. पाश्चात्त्य माध्यमांचा आढावा घेतला, तर दीर्घकालीन उपाययोजना करायला हव्यात, असा एकुणात सूर आहे. पाकिस्तानच दहशतवाद्यांना आश्रय देतो, हे जगाला मान्य आहे. चीनच्या पातळीवर अमेरिकेला भारत जास्त महत्त्वाचा आहे. जर्मनी आणि फ्रान्स ही राष्ट्रेही भारताविषयी जवळीक ठेवणारी आहेत. या सार्‍यांचा विचार करून, पाकिस्ताननामक मुळावर घाव घालण्याआधी काश्मीर शांत करण्याचे प्रयत्न व्हायला हवे.