गँगस्टर संतोष आंबेकरच्या भाच्याला मारहाण करून लुटले
   दिनांक :19-Feb-2019
नागपूर,
गँगस्टर संतोष आंबेकरच्या भाच्याला मारहाण करून ५८ हजार ८०० रुपयांनी लुटल्याची घटना नंदनवन हद्दीत व्यंकटेश कॉलनी येथे घडली.
 
शैलेष ज्ञानेश्वर केदार (३२) रा. इतवारी हायस्कूलजवळ, दारोडकर चौक असे या भाच्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी शैलेष केदारने व्यंकटेश कॉलनी येथील मते बियर शॉपीच्या बाजूला चायनिज सेंटर सुरू केले होते. १७ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० च्या सुमारास शैलेष हा त्याचे साथीदार रवि हेडाऊ आणि आदर्श सातपुते यांच्यासह दुकानात ग्राहकांना चहा व मॅगी बनवून देत होता. त्यावेळी आरोपी भोला, गणेश नाईक, आकिब उर्फ सोनू, पीयुष हे आपल्या दोन साथीदारांसह शैलेशच्या दुकानात आले.
 
आरोपींनी शैलेषला चहा मागितला. चहा पिल्यानंतर शैलेषने चहाचे पैसे मागितले असता आरोपींनी त्याला ‘कबसे यहा ठेला लगा रहा है. हमे पहचानता नही क्या. हम यहा के दादा है. हमारे आदमीसे कभी पैसे नही लेनेका' असे म्हटले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत आरोपींनी शैलेषच्या गालावर गट्टूने आणि हातावर लोखंडी रॉडने वार करून जखमी केले. त्याचप्रमाणे तलवार काढून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शैलेषच्या गळ्यातील सोनसाखळी, हातातील चांदीचे कडे आणि गल्ल्यातील रोख १४ हजार ८०० रुपये असा ५८ हजार ८०० रुपयांचा ऐवज हिसकावून पळ काढला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.