तीन तासात साकारले शिवरायांचे शिल्प
   दिनांक :19-Feb-2019
-राजकमल चौकात पुर्णत्वास आणली कलाकृती
अमरावती,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज मंगळवारी सायंकाळी राजकमल चौकात १२  शिवप्रेमी तरुणांनी युवा मुर्तिकार सुदाम पाडवार यांच्या नेतृत्वात अवघ्या तीन तासात शिवरायांचे ७ फुट उंच अर्धाकृती शिल्प साकारुन उपस्थितांची दाद मिळविली.
 
 
 
मुर्तिकार सुदाम पाडवार याने शिवजयंती निमित्त शिवरायांचे शिल्प साकारण्याची इच्छा भाजपा नेते तुषार भारतीय यांच्याजवळ व्यक्त केली होती. त्यांनी हे शिल्प शहरातल्या अत्यंत वर्दळीच्या राजकमल चौकात साकारण्याची कल्पना त्याला दिला. मुर्तिकार पाडवार याला संपूर्ण सहकार्य करुन शिल्प तयार करण्याची व्यवस्था नवयुवक विद्यार्थी संघटनेने नगरसेवक अजय सारसकर यांच्या मदतीने उभी केली. सायंकाळी ५.३० वाजता शिल्प तयार करण्याचे कार्य शिवप्रेमी युवकांनी सुरु केले. तत्पूर्वी शिल्प उभारण्याच्या जागेचे पूजन तुषार भारतीय, नवयुवक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, अजय सारसकर, बबन रडके, आशिष अतकरे, गावंडे पाटील, राजू परिहार, सचिन सैनी यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर मुर्तिकार सुदाम पाडवार यांच्या नेतृत्वात गजानन गुजरे, शिवा वडुरकर, चरण विचारे, निलेश बागवान, शिवा वालदे, किशोर चिकटे, मुकेश मुंडरे, पंकज कदम, विक्की मसांगे, गौरव रोतळे, प्रमोद जोहरे या युवकांनी शिवरायांचे शिल्प आकारास आणण्यास सुरुवात केली.
 
 
 
शिवाजी महाराजांच्या पोवाड्याच्या गजरात युवकांनी रात्री ८.३० पर्यंत म्हणजेच सलग तीन तास परिश्रम घेवून शिल्प पुर्णत्वास आणले. विशेष म्हणजे हे शिल्प तयार होत असतांना शेकडो नागरिक तेथे उभे होते. सर्वांनीच अवघ्या तीन तासात तयार झालेल्या या शिल्पाला दाद दिली आणि शिवप्रेमी युवकांचे कौतुक केले. 
 
शहीद कुटुंबियांना करणार मदत
 
शिवरायांच्या या शिल्पाची विक्री हे शिवप्रेमी युवक करणार आहे. त्यातून जो निधी गोळा होईल, तो पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांना मदत म्हणून देणार आहेत. अद्याप हे शिल्प विकत घेण्यासाठी कोणी पुढे आलेले नाही. पण हे शिल्प निश्चित शिवप्रेमी व्यक्तिंकडून विकत घेतले जाईल, असा विश्वास या युवकांनी व्यक्त केला आहे.