२०१९ आयपीएलचे वेळापत्रक जाहीर, आरसीबी- सीएसकेत पहिली लढत
   दिनांक :19-Feb-2019
 
 
 
मुंबई,
देशात लोकसभा निवडणूकांसोबतच इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) रंगणार आहे. आज मंगळवारी आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सोहळे एकाचवेळी जर देशात झाले तर सुरक्षायंत्रणेवर अतिरीक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे लोकसभा निवडणुक लक्षात घेता आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलच्या १२ व्या हंगामाची सुरुवात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने होईल. 
मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. २३ मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली होती. आयपीएल दरम्यान भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले होते. 
 
 
सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यासाठी तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
इंडियन प्रीमिअर लीगच्या २०१९च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव जयपूर येथे झाला. ७० जागांसाठी ३४६ हून अधिक खेळाडू रिंगणात होते. त्यात सर्वाधिक भाव खाल्ला तो वरुण चक्रवर्ती, जयदेव उनाडकट यांनी. पण आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागड्या खेळाडूचा मान अजूनही युवराज सिंगच्या नावावर आहे. २०१५ मध्ये त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स ( सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाने १६ कोटींत विकत घेतले होते.