हॉटेलच्या व्यवसायात कोट्यवधींनी गंडविले
   दिनांक :19-Feb-2019
 

 
नागपूर,
नवीन हॉटेल सुरू करण्याचे आमिष दाखवून इतर तीन भागीदारांची १ कोटी ३५ लाख ७० हजाराने फसवणूक केल्याप्रकरणी धंतोली पोलिसांनी आलविन मार्टिन नोलबर्ड गोम्स (४९) रा. मेघदूत विला, सोनेगाव यास अटक केली.
 
आरोपी एल्विन गोम्स हा हॉटेल सेंटर पॉईंट येथे कामाला होता. याच हॉटेलमध्ये शोमीत सिद्धीनाथ बागची (३८) नेल्को सोसायटी, खामला हे चार्टर्ड अकाऊन्टंट म्हणून कामाला होते. त्यामुळे गोम्स आणि बागची यांच्यात ओळख होती. याच हॉटेलमध्ये बागची यांचे मित्र सुमीत हेडा आणि पंकज राठी हे जेवण करण्यासाठी आणि पार्टी करण्यासाठी येत असत. बागची यांच्यामुळेच गोम्सची हेडा आणि राठी यांच्याशी ओळख झाली. २०१५ साली गोम्सने बागची आणि त्यांच्या मित्रांना हॉटेल व्यवसाय सुरु करा. त्यात खूप पैसे कमवून देईन अशी गळ घातली. हॉटेलच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी हेडा आणि राठी यांनी आपली तयारी दर्शविली.
  
त्याचप्रमाणे चौघांच्याही भागीदारीत हॉटेल सुरू करण्याचे ठरले. त्यानुसार त्यांनी गोम्स फूड आर्ट प्रा. लि. भागीदार कंपनी स्थापन करण्याचे ठरविले. कंपनीची स्थापना करतेवेळी चौघांचेही २५ टक्के शेअर्स राहतील असेही ठरले. त्यावेळी गोम्सकडे पैसे नसल्याने काही दिवसांनी शेअर्सचे पैसे देतो असे त्याने अन्य तीन भागीदारांना सांगितले. त्यानुसार त्यांनी कॅनरा बँकेत कंपनीचे खाते उघडले. त्या खात्यात बागची आणि हेडा यांनी ७३ लाख ५२ हजार १०० रुपये गुंतविले. हॉटेल विकत घेण्यासाठी त्यांनी कॅनरा बँकेतून १ कोटी ६० लाखांचे कर्ज घेतले. फर्निचर आणि इतर भांडवलासाठी ५५ लाखांचे कर्ज घेतले.
 
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी बागची यांनी ६५ लाख ५४१६ रुपये, हेडा यांनी ४५ लाख १६ हजार आणि राठी यांनी १ कोटी ७७ लाख ८६ हजार ५५९ रुपये कंपनीत गुंतविले. आरोपी गोम्सने कंपनीत कसल्याही प्रकारे गुंतवणूक केली नाही. बँकेकडून घेतलेले कर्ज चुकते करण्यासाठी त्यांनी एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीकडून २ कोटी ६९ लाख ५५ हजार ८८२ रुपयांचे कर्ज घेतले आणि कॅनरा बँकचे कर्ज परत केले. एल अ‍ॅण्ड टी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची दर महिन्याला बागची, हेडा आणि राठी परतफेड करीत आहेत.
 
२०१५-१६ साली कंपनीने पोर्ट ओ गोम्स या नावाने हॉटेल सुरू केले. गोम्स यास हॉटेल व्यवसायाचा अनुभव असल्याने इतर तीन भागीदारांनी त्याला हॉटेल चालविण्यास दिले. परंतु, हॉटेल व्यवसायातून आलेली रक्कम गोम्सने कंपनीच्या खात्यात न भरता स्वत:च्या नावे असलेल्या गोमेज ब्रिज या फर्मच्या खात्यात वळते करून कंपनीची १ कोटी ३५ लाख ७० हजार ८०२ रुपयांनी फसवणूक केली. त्याचप्रमाणे हॉटेलचे बिल, वावचर्स, लेखा पुस्तके कंपनीला परत न करता चोरून नेले. याप्रकरणी बागची यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी ३७९, ४२० अन्वये गुन्हा नोंदवून गोम्स यास अटक केली आहे.