शिवरायांचे शौर्य सैन्याच्या रक्तात भिनलेले: हंसराज अहिर
   दिनांक :19-Feb-2019

 
 
तभा वृत्तसेवा/ चंद्रपूर,
शिवरायांनी असामान्य शौर्य व कर्तृत्वाच्या बळावर स्वराज्याची स्थापना केली व मुघल साम्राज्याला उद्ध्वस्त केले. त्यासाठी छत्रपतींच्या मावळ्यांनी जे शौर्य गाजवले, त्या इतिहासाचे स्मरण देशवासीयांना असल्याने या शौर्याचा इतिहास आमच्या शुरवीर सैन्यांच्या हृदयसिंहासनावर कोरला गेला आहे. त्यामुळे राष्ट्राच्या संरक्षणासाठी आपले शीर तळहातावर घेवून मुघलांची औलाद असलेल्या आतंकवाद्यांशी ते लढत आहेत. पुलवामा येथील भ्याड आत्मघाती हल्ल्यात ज्या ४२ जवानांनी शहीदत्व पत्करले, त्यांचे बलिदान व्यर्थ जावू न देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे. त्याची परिणीती देशवासीयांना लवकरच बघायला मिळेल, असा दृढविश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केला. ते आज मंगळवारी श्यामनगर येथे आयोजित शिवजयंती उत्सवाला संबोधित करीत होते. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक राजेश मून, नगरसेविका जयश्री जुमडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
 
 
ढोल-ताश्यांच्या गजरात साजरी झाली शिवजयंती
 
स्थानिक कमल स्पोर्टींग क्लबच्या वतीने महानगरातील छोटूभाई पटेल महाविद्यालयासमोरील चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी कलापथकाद्वारे देशभक्तीपर संगीत मैफल रंगली. तर जगदंग ढोल-ताशा पथकद्वारे शिवरायांना आदरांजली अर्पण करण्यात आली. युवक-युवतींच्या या पथकात दोन चिमुकल्यांनी शिवबा व जिजाऊंची भूमिका साकारत जय शिवाजी, जय जिजाऊंची घोषणा केली. या जयघोषाने शिवाजी चौक परिसर दुमदुमला होता.
 
तसेच तुकुम परिसरातील एसटी वर्कशॉप चौकात सर्वधर्मीय युवा ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हनुमान नगर ते शहिद भगतसिंग चौकपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हत्तीवर स्वार झालेल्या शिवाजी महाराजाची प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र ठरले. लेझीम पथक व ढोल-ताशा पथकानेही शिवभक्तांचे लक्ष वेधले होते.