पर्यटन पॅकेज च्या बहाण्याने फसवणूक
   दिनांक :19-Feb-2019
आकर्षक टूर पॅकेज देण्याच्या बहाण्याने साकीनाका येथे राहणाऱ्या काहीजणांना दोन लाख ३५ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

 
 
 
अंधेरीच्या काजूपाडा येथे राहणारे सदादूर पाल हे एका फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी करतात. पाल यांनी त्यांचे मित्र आणि कुटुंबियांसोबत मसुरी, नैनिताल या ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याचे ठरवले. पाल यांनी इंटरनेटवर पॅकेज टूरसाठी शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान एका नामांकित कंपनीचे नाव आणि माहिती त्यांना मिळाली. या कंपनीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या संपर्क क्रमाकांवर पाल यांनी संपर्क साधला. पंकजकुमार असे नाव सांगणाऱ्या कंपनीच्या या प्रतिनिधीने पाल यांना १७ जणांचे राहणे, फिरणे आणि प्रवासाचे साडेतीन लाखाचे पॅकेज दिले. पाल आणि त्याच्या मित्रांनी या पॅकेजसाठी तयारी दाखवली. हॉटेल बुकिंग, विमान बुकिंग, आगाऊ रक्कम अशी विविध कारणे सांगून पंकजकुमार याने टप्प्याटप्प्याने दोन लाख ३५ हजार इतकी रक्कम विविध खात्यांमध्ये भरण्यास सांगितले. त्यानुसार पाल यांनी ही रक्कम जमा केली. पाल यांनी या सर्व बुकिंगचे फोटो कॉपी पाठवण्यास पंकजकुमार याला सांगितले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या पंकजकुमार याने काही दिवसांनी मोबाइल बंद केला.
विमान बुकिंगबाबत त्याने पाठवलेला मेल आणि पॅकेजच्या माहितीचा मेल याची शहानिशा करण्यासाठी पाल यांनी विमान कंपनी आणि टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सशी संपर्क साधला. त्यावेळी आधी बुकिंग करण्यात आले होते मात्र नंतर ते रद्द करण्यात आल्याचे कंपनीमार्फत सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाल यांनी साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रर केली. साकीनाका पोलिस फसवणूक करणाऱ्या पंकजकुमार याचा शोध घेत आहेत.