पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तान जवाबदार असल्याचे भारताने पुरावे द्यावे-इम्रान खान
   दिनांक :19-Feb-2019
इस्लामाबाद
पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारताने कोणतेही पुरावे नसताना पाकिस्तानवर आरोप केले आहेत, अशा शब्दात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचे सांगून भारताचे आरोप फेटाळून लावले आहेत. दहशतवादाच्या मुद्द्यावर आमची चर्चेची तयारी असून या हल्ल्याबाबतचे पुरावे भारताने आम्हाला द्यावे, असे आवाहनही खान यांनी भारताला केले आहे. मात्र, भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास पाकिस्तान त्याला उत्तर देणार नाही असे समजू नये, पाकिस्तान हल्ल्याला उत्तर देणार, असा इशाराही इम्रान खान यांनी भारताला दिला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाक पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 
 
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानमधील कुणी जबाबदार आहे हे सिद्ध करणारे पुरावे भारताने दिल्यास पाकिस्तान सरकार त्या विरोधात कठोर कारवाई करेल हे आमचे भारत सरकारला सांगणे आहे, असेही खान म्हणाले. पाकिस्तान देश स्थिरतेकडे वाटचाल करत असताना अशा प्रकारचे कृत्य तो करू शकत नाही. अशा प्रकारचा हल्ला करून पाकिस्तानला काय मिळणार आहे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.
दहशतवाद या विषयावर भारताने संवाद साधला पाहिजे. आम्ही भारताशी या विषयावर संवाद साधायला तयार आहोत. हा प्रश्न संवादानेच सुटेल अशा शब्दात इम्रान खान यांनी भारताला चर्चेचे आवाहन केले आहे. पाकिस्तानला दहशदवादामुळे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानचे ७० हजार दहशतवादाचे बळी ठरले आहेत. आमच्या भूमीचा वापर करून जर कुणी दहशतवादी कारवाया करत असेल, तर ते आमच्या भूमिकेविरुद्ध आहे असेही इम्रान खान म्हणाले.