अमरावतीत शिवाजी महाराजांचा जयघोष; फ्लॅशमॉबने वेधले लक्ष
   दिनांक :19-Feb-2019
अमरावती,
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंगळवारी सकाळपासूनच अमरावती शहरात त्यांचा जयघोष सुरू झाला. विविध संघटना व युवा मंडळांनी भव्य शोभायात्रा काढून शिवरायांना मानाचा मुजरा केला. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाचा फ्लॅशमॉब आणि मंगलवेषातील ढोल-ताशा पथकाच्या वादनाने सर्वांचे लक्ष वेधून गेले.

 
 
तारखेनुसार मंगळवारी शिवसेना सोडून काही राजकीय पक्ष व काही संघटनांनी आणि विविध शासकीय कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे यंदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग दिसून आला. युवकांच्या अनेक मंडळांनी शोभायात्रा व दुचाकीवर मिरवणुका काढून शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा करीत त्यांचे स्मरण केले. या सर्व शोभायात्रा शहरातल्या विविध भागातून शिवरायांचा जयघोष करीत मार्गस्थ झाल्या. अनेक ठिकाणी ढोल-ताशाचे तालबद्ध वादन झाले. या पथकातील तरुण मुलामुलींनी परिधान केलेला मंगळवेष व ढोल वाजविण्याची कला सर्वांचे आकर्षण ठरली.

 
 
 
शिवटेकडीवर जाऊन शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्प व हार अर्पण करून वंदन करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या शिवाय सिपना शिवमहोत्सवा अंतर्गत सिपना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजता सायन्सकोर मैदानावरून भव्य दुचाकी रॅली काढली. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मंगलवेषात या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. ही रॅली पंचवटी, इर्विन, जयस्तंभ मार्गे राजकमल चौकात पोहचली. येथे विद्यार्थ्यांनी फ्लॅशमॉबचे सादरीकरण केले.
 
 

 
 
डोळ्याचे पारणे फेडणारा हा फ्लॅशमॉब होता. वेशभूषेतले शिवाजी महाराज, मावळे, सरदार आणि मंगलवेशातल्या तरुणींचे सामूहिक नृत्य  पाहण्यासारखे होते. उपस्थितांनी त्यांची प्रशंसा केली. त्यानंतर सिपनाची रॅली बडनेरा मार्गावरच्या महाविद्यालयाकडे रवाना झाली.