जागतिक महिला फलंदाज क्रमवारीत भारताची स्मृती मंधाना अव्वल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
दुबई,
शनिवारी आयसीसीच्या जागतिक महिला फलंदाज क्रिकेटपटूंच्या अद्ययावत करण्यात आलेल्या जागतिक क्रमवारीत भारताच्या स्मृती मंधानाने अव्वल स्थान पटकावले आहे.
 
 

 
 
 
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत स्मृतीने चौथे वन-डे शतक व नाबाद 90 धावांची आकर्षक खेळी केल्यानंतर तिने जागतिक महिला फलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान मिळविले. तिने ऑस्ट्रेलियाच्या इलियास पेरी व मेग लिंनगला मागे टाकले आहे. 2018च्या सुरुवातीपासून स्मृती मंधानाने 15 सामन्यात वन-डे सामन्यात जबरदस्त कामगिरी केली असून तिने 2 शतके व 8 अर्धशतके झळकावली आहेत.
 
 
 
 
भारताविरुद्धच्या मालिकेत सलग अर्धशतके झळकाविणारी न्यूझीलंडची कर्णधार अॅमी सॅटरवेटने दहा स्थानांची घेत घेत चौथे स्थान मिळविले, तर भारतीय कर्णधार मिताली राज एक स्थान खाली घसरली आहे. न्यूझीलंडची माजी कर्णधार सुझी बेट्‌स सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. लिझेली ली (दक्षिण आफ्रिका), टॅमी बेऊमॉण्ट (इंग्लंड), स्टॅफनी टेलर (वेस्ट इंडीज) व चमारी अतापट्टू (श्रीलंका) यांनी अव्वल दहामध्ये स्थान मिळविले आहे.
 
 
 
 
 
भारताची युवा क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जने 64 व्या स्थानावरून 61 व्या स्थानावर झेप मारली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात पदार्पण केल्यानंतर 18 वर्षीय जेमिमाने केवळ सात वन-डे सामने खेळलेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेतील पहिल्या सामन्यात तिने नाबाद 81 धावांची खेळी केली होती.