नव्या भारताचे अभिवचन!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
वर्षाच्या पहिल्या संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींचे अभिभाषण असते. हे भाषण जसे राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळाच्या कामगिरीचे वर्णन असते, तसे ते सरकारच्या आगामी योजनांचे, धोरणांचे सूतोवाचही करणारे असते. गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांसमक्ष राष्ट्रपती रामनाथ कोिंवद यांनी जे अभिभाषण केले, ते वैशिष्ट्यपूर्ण होते. मुख्य म्हणजे ते पारंपरिक पद्धतीचे रटाळ वाचन नव्हते. त्यात जोश होता, आश्वस्त स्वर होता. आणि का नसावा? आपण नियुक्त केलेल्या सरकारने जर उत्कृष्ट कामगिरी केली असेल, तर कुणाची छाती अभिमानाने भरून येणार नाही?
 
नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे अभिभाषण होते. त्यामुळे स्वाभाविकच, या भाषणात, गेल्या साडेचार वर्षांतील कामगिरीचा उल्लेख होता. या चार वर्षांतील कामगिरी तर चांगलीच होती, परंतु गेल्या वर्षीची कामगिरी कितीतरी पटीने सरस होती, असे लक्षात येईल. मोदी आले तेव्हा सर्वकाही जुनेच होते. नोकरशाही, सरकारी व बँक कर्मचारी, सुरक्षा जवान, पोलिस तेच होते. परंतु, योग्य नेतृत्व मिळाले की, हीच मंडळी कसे उत्कृष्ट परिणाम देतात, याचे ढळढळीत उदाहरण नरेंद्र मोदी यांनी देशासमोर ठेवले आहे. गेली चार वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे अथक परिश्रम घेतले, त्याची फळे आता दृग्गोचर होऊ लागली आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात, मोदी सरकारच्या उपलब्धींची भली मोठी यादी होती. परंतु, एक परिणाम समोर येतो तेव्हा त्याच्या आधी पडद्यामागे अनेक घडामोडी, लहानमोठ्या क्रिया-प्रक्रिया घडलेल्या असतात किंवा घडत असतात. त्याही आपण समजून घेतल्या पाहिजेत. तेव्हा आपल्या लक्षात येईल की, गेली चार वर्षे आपल्या देशात अगणित लहान-मोठ्या प्रकि‘या घडवून आणल्या गेल्यात, त्याचे फळ आज आपल्याला मिळत आहे.
 
एक साधे उदाहरण घेऊ या. दुबईतून राजीव सक्सेना व दीपक तलवार यांना सरळ उचलून विमानाने भारतात आणण्यात आले. हे काय अचानक घडले का? संयुक्त अरब अमिरात काय मॉल आहे का, की तिथे गेले आणि हवी ती वस्तू उचलून घेऊन आले? आतापर्यंत पाकिस्तानचा कट्‌टर पाठीराखा असलेला संयुक्त अरब अमिरातसारखा देश, भारताला त्याच्या देशातून दोन-तीन व्यक्तींना थेट उचलू देतो, हे कसे शक्य आहे? नरेंद्र मोदी गेली चार वर्षे पायाला िंभगरी लावून विदेशात फिरले, त्याचा हा परिणाम आहे. काम केले की फळ मिळणारच. मोदींचे परदेश दौरे, मनमोहनिंसग किंवा राजीव गांधींच्या दौर्‍यांसारखे नव्हते. मोदी तिथे जाऊन काय करतात आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत, याची पूर्ण कल्पना कॉंग्रेससहित इतरही विरोधी पक्षांना होती. त्यामुळेच त्यांनी या परदेश दौर्‍यांवर वाह्यातसारखी टीका करणे सुरू केले. आम्ही मध्यमवर्गीय लोकदेखील अशीच टीका करत हसत होतो. परंतु, मोदी आपले काम करत राहिले.
 
देशातील गरिबांना देण्यात येणारी मदत, शंभर टक्के त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, हे सर्वांनाच मान्य आहे. परंतु, तसे घडत नव्हते. राजीव गांधींनी म्हटले की, केंद्राकडून निघालेल्या एक रुपयातील केवळ पाच पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. लोकांनी खूप टाळ्या वाजविल्या. राजीव गांधींच्या स्पष्टवक्तेपणाचे लाळ सांडेपर्यंत कौतुक केले. पण, पुढे काय? पुढेही लाभार्थ्याला पाचच पैसे मिळत राहिले. नरेंद्र मोदींनी हे दुष्टचक्र मोडले. भारतातील प्रत्येक कुटुंबाचे किमान एक तरी बँकखाते राहील, यासाठी जनधन खाते योजना राबविली. नेहमीप्रमाणे उथळ विरोधी पक्ष, वरवरचे विचारवंत यांनी त्याची टर उडवली. पण, आज आपण बघतो की, या योजनेमुळे सरकारी मदत लाभार्थ्याच्या खात्यात थेट जाऊ लागली. याने दोन गोष्टी झाल्यात. लाभार्थ्याला पूर्ण मदत मिळू लागली आणि सरकारचे पैसेही वाचले. प्रारंभीच्या वर्षी मोदी सरकारने एकापेक्षा एक अभिनव योजना सुरू केल्या होत्या. कालांतराने त्याची फळे दिसू लागली. त्या सर्वांचा उल्लेख राष्ट्रपतींच्या अभिभाषणात होता.
 
 
 
आपल्या देशातील प्रशासनाची व्यवस्था पाहिली, तर एखादी नवी योजना सुरू करायची असेल तर ती सुरू व्हायलाच कमीतकमी दोन वर्षे लागतात. इतके अडथळे, इतकी गुंतागुंत करून ठेवली आहे प्रशासनात. ते सर्व सांभाळून, इतकेच नव्हे, तर न्यायव्यवस्थेचाही सन्मान करत, मोदी सरकारने विकास कामांना जी गती आणली आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदन नको का करायला? राष्ट्रपतींनी अभिभाषणात ते मोठ्या अभिमानाने केले आहे.
 
नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत नवा भारत घडविण्याचे लक्ष्य ठरविले आहे. म्हणजे केवळ चार वर्षे. त्याचीही अंमलबजावणी सुरू झाली आहे. हा नवा भारत कसा असेल, याची सविस्तर चर्चा नरेंद्र मोदी आपल्या भाषणांतून करत असतात. ही घोषणा इंदिरा गांधी यांच्या ‘गरिबी हटाव’सारखी बुडबुडा नाही. मोदी तसे करतही नाहीत, असे आता लोकांच्याही लक्षात आले आहे. जे करू शकू तेच ते बोलतात आणि जे बोलतात ते करूनच दाखवितात, असा मोदी सरकारचा लौकिक झाला आहे आणि तो या सरकारने स्वकर्तृत्वाने प्राप्त केला आहे. त्यामुळे मोदी सरकारची नव्या भारताची योजना आपल्यासार‘या बहुसं‘यांना याच जन्मी साकार झालेली बघायला मिळू शकते, यात शंका नाही!
 
व्यक्ती असो वा समाज, तो आशेवर जगत असतो. या देशातील आधीचे सरकार काही करेल, देशाला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करेल, देेशाला आर्थिकदृष्ट्या प्रबळ करेल, अशी आशाच केव्हाच मावळली होती. जे गरीब, वंचित आणि उपेक्षित आहेत, त्यांचे तर जीवन नरकासमानच झाले होते. आशेचा किरणही कुठे दिसत नव्हता. परंतु, मोदी सरकारने समाजातील हा निराशेचा सूर महत्प्रयासाने दूर केला. एकप्रकारचा उत्साह समाजात उत्पन्न केला. नेतृत्वाचे तर हे कामच असते. परंतु, तसे नेतृत्व भारताला मिळाले नव्हते. राजकारणी व्यक्ती राजकारण करणारच. कारण या राजकारणातूनच ते सत्तेत येत असतात. परंतु, राजकारण करतानाही, विचारांची आणि तदनुसार कार्याची दिशा ही देशहिताची असली पाहिजे.
 
आपल्या प्रत्येक कृतीतून देशाचे हितच साधले गेले पाहिजे, अशी धारणा राजकारणी व्यक्तींची असायला हवी. नरेंद्र मोदी यांच्या कृतीतून ही वृत्ती स्पष्टपणे दिसून येते. देशाचे असे कुठलेही क्षेत्र नसेल की ज्यात मोदी सरकारच्या कार्यामुळे सकारात्मक बदल झालेला नाही. प्रत्येक क्षेत्र उजळून निघत आहे. जनसामान्यांवर विलक्षण पकड असणारा नेता म्हणून नरेंद्र मोदी सिद्ध झाले आहेत. अशा या लोकप्रियतेचा वापर नरेंद्र मोदी नवा भारत घडविण्यासाठी करत आहेत, ही दिलासा देणारी बाब आहे. भारतातील नव्या पिढीला असा भारत देश सुपूर्त करायचा की, त्यांनाही या देशाचा अभिमान वाटावा, अशी जिद्द नरेंद्र मोदी यांनी धरली आहे. त्या दृष्टीने ज्या काही पायाभूत गोष्टी, रचना करायला हव्यात, त्या आधीच सुरू झाल्या आहेत. या सर्व योजनांना, धोरणांना सर्व समाजाने पािंठबा द्यावा, असे जे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोिंवद यांनी आपल्या अभिभाषणात केले आहे, ते सर्वांनी गंभीरतेने घ्यायला हवे. नवीन भारत घडताना आम्ही आमचे क्षुद्र स्वार्थ, रागलोभ, आवडीनिवडी बाजूला ठेवल्या आणि आपापल्या परीने त्यात योगदान दिले, असे आम्हाला पुढच्या पिढीला अभिमानाने सांगता आले पाहिजे. ही प्रेरणा राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून देशवासीयांना मिळेल, अशी आशा आहे.