अमरावती विद्यापीठाच्या महिला क्रिकेट चमूचा दणदणीत विजय
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
अमरावती,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिलांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूने नागपूर विद्यापीठावर निसटती मात करीत गट विजेतेपदाकडे आगेकूच केली आहे. धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या प्रांग़णावर आयोजित सामन्यामध्ये नागपूरच्या संघाने नाणेफेक जिंकून अमरावती विद्यापीठाच्या संघास प्रथम फलंदाजी करीता पाचारण केले. प्रथम फलंदाजी करतांना अमरावती विद्यापीठाच्या संघाने रातुम नागपूर विद्यापीठाच्या संघास 07 गड्यांच्याच्या मोबदल्यात 116 धावांचे माफक लक्ष ठेवले. यामध्ये अमरावती विद्यापीठाकडून सर्वाधिक 28 धावा मनिषा शिंदे हिने केल्या. तिला अनुक्रमे 23 व 22 धावांची साथ ममता महाजन व गौरी ठाकरे हिने दिली.
 
 
 
प्रत्युत्तराकरिता दाखल झालेला नागपूर विद्यापीठाचा संघ मोठा आत्मविश्वासाने मैदानावर उतरला परंतु संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या महिला गोलंदाजांच्या पुढे त्यांचा टिकाव लागु शकला नाही. विसाव्या षटकाच्या शेवटी नागपूर विद्यापीठाला 114 धावांची मजल मारता आली व अशा रितीने अगदी निसटत्या फरकाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघाने क गटाच्या विजेते पदाकरिता आपले आव्हान कायम ठेवले. दिनांक 03 फेब्रुवारीला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा सामना गतवर्षी तृतिय स्थानावर राहिलेल्या आय.टी.एम. विद्यापीठ, ग्वालियर, या संघाशी होईल. या संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रा. किशोर तायडे तर व्यवस्थापक म्हणून प्रा. एस.एम. खानझोडे यांची नियुक्ती विद्यापीठाद्वारे करण्यात आलेली आहे. 
 
 
 
 
या संघाचे कौतुक करण्याकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य संजय लोखंडे व डॉ. धनंजय वेळूकर हे उपस्थित होते. कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व निवड समितीच्या सर्व सदस्यांनी या संघास पुढील सामन्यांकरिता शुभेच्छा दिल्या.