शेतकर्‍यांसाठी कॉंगे्रस ढाळतोय्‌ नकाश्रू - अरुण जेटली यांचा जोरदार हल्ला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
नवी दिल्ली,
शेतकर्‍यांच्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक असाच असल्याने, त्यावर टीका करून कॉंगे्रसने शेतकर्‍यांसाठी नकाश्रू ढाळणे बंद करावे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी आज शनिवारी हल्ला चढविला.
 
 

 
 
 
 
 
हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, दोन एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांना वार्षिक 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली. हा शेतकर्‍यांचा अपमान असल्याची टीका कॉंग्रेसने केली होती. यावरून अरुण जेटली यांनी कॉंगे्रसला चांगलेच धारेवर धरले.
 
 
 
अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या तरतुदींचा फायदा देशभरातील 12 कोटी शेतकर्‍यांना मिळणार आहे. देशाचा विकास आणि शेतकरी स्वयंपूर्ण कसा होईल, तसेच रोजगार कसे निर्माण होतील, हीच आमच्या सरकारची प्राथमिकता आहे; मात्र विकासाचे वावडे असलेल्या कॉंग्रेस पक्षाकडून सरकारच्या चांगल्या कामांचे कौतुक करण्याची अपेक्षा तरी कशी करायची. देशावर सर्वाधिक काळ सत्ता करणार्‍या कॉंगे्रसने शेतकर्‍यांसाठी आजवर काहीच केले नाही. आम्ही शेतकरी स्वयंपूर्ण कसा होईल यावर भर देत आहोत, मात्र कॉंग्रेसला ते दिसत नाही. सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करण्यातच हा पक्ष धन्यता मानतो. कॉंगे्रसचे शेतकर्‍याविषयी असलेले प्रेम एक ढोंग असून, मगरीने अश्रू ढाळण्यासारखा हा प्रकार आहे, अशी बोचरी टीका जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर केली आहे.
 
 
 
 
2014 मध्ये भाजपाप्रणीत रालोआचे सरकार येण्यापूर्वी कॉंगे्रसप्रणीत संपुआने देशावर 10 वर्षे सत्ता केली. त्यावेळी शेतकर्‍यांसाठी कॉंग्रेसने काय केले, 52 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी संपुआ सरकारने जाहीर केली होती, पण प्रत्यक्षात हे पैसे शेतकर्‍यांना न मिळता दलालांच्या हातात गेले. ही सत्यता शेतकरी विसरला नाही, मोदी सरकारने शेतकरी आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत; मात्र शेतकर्‍यांसाठी खोटी सहानुभुती बाळगणार्‍या कॉंग्रेसला हे कधीच कळणार नाही, असेही जेटली यांनी म्हटले आहे.