खाद्य पदार्थांच्या पाकिटावर आटा, मैदा उल्लेख बंधनकारक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
इंग्रजी नावामुळे होणारा गोंधळ दूर करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसआय) सर्व उत्पादकांना हे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील ‘व्होल व्हीट फ्लोर’ किंवा ‘व्हीट फ्लोर’ या इंग्रजी नावासोबतच ‘आटा’ किंवा ‘मैदा’ असे लिहिणेही बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

 
 
 
 
 
खाद्यपदार्थाच्या पाकिटावर नमूद केलेल्या घटक अन्नपदार्थामध्ये गव्हाच्या पीठाचा किंवा मैदाचा उल्लेख करताना ‘ व्होल व्हीट फ्लोर’, ‘व्हीट फ्लोर’ किंवा ‘रिफाईण्ड व्हीट फ्लोर’ असे लिहिलेले असते. या इंग्रजी नावांमुळे मात्र यामध्ये नेमक्या कोणत्या पदार्थाचा वापर केला आहे, यावरुन ग्राहकांचा गोंधळ उडतो. तेव्हा अन्नपदार्थाबाबत योग्य माहिती ग्राहकांना प्राप्त व्हावी या उद्देशाने एफएसएसआयने हा आदेश काढला आहे.
 
‘व्होल व्हीट फ्लोर’चा वापर केलेल्या अन्नपदार्थाच्या पाकिटावर ‘व्होल व्हीट फ्लोर (आटा)’असे नमूद करावे, तर ‘रिफाईण्ड व्हीट फ्लोर’चा वापर केलेल्या पाकिटावर ‘रिफाईण्ड व्हीट फ्लोर (मैदा)’ असे लिहावे, असे या आदेशात म्हटले आहे. उत्पादकांना यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत एफएसएसआयने दिली आहे.