अमेरिकेकडून 73 हजार रायफल्स खरेदी करणार; संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली, 
 
 
अमेरिकेकडून ७३ हजार अत्याधुनिक रायफल्स खरेदी करण्याच्या लष्कराच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने आज शनिवारी मंजुरी दिली. चीनला लागून असलेल्या ३६०० किलोमीटरच्या सीमेचे रक्षण करणार्‍या जवानांना या अत्याधुनिक रायफलींनी सज्ज केले जाणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्कराचा हा प्रस्ताव रखडला होता. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी आज त्यावर आपली मोहोर उमटवली, अशी माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
 
 
 
सिग सौर असे या रायफलींचे नाव असून, अमेरिकन सैनिक युद्धात याच रायफल्सचा वापर करीत असतात. याशिवाय, काही युरोपियन देशांकडेही याच रायफली आहेत. पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत या रायफली भारतीय जवानांच्या हातात असतील, असे अधिकार्‍याने सांगितले.
 
 
 
 
पुढील आठवड्यात या संदर्भात करार पूर्ण केला जाणार आहे. त्यानंतर सुमारे एक वर्षाच्या कालावधीत या रायफलींचा पुरवठा झालेला असेल. इन्सास या रायफलींची जागा या नव्या अत्याधुनिक रायफल्स घेणार आहेत.
पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या सीमांवरून भारतीय सुरक्षेला निर्माण झालेला धोका लक्षात घेता, भारतीय लष्कराकडे अत्याधुनिक रायफल्स असाव्यात, ही लष्कराची फार जुनी मागणी आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ती प्रलंबित आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये लष्कराने सुमारे सात लाख रायफल्स, ४४ हजार हलक्या मशिनगन्स आणि ४४,६०० कार्बाइन्स खरेदी करण्याची प्रकि‘या सुरू केली होती.