लाचप्रकरणी न. प. मुख्याधिकारी अतुल पंत व रोखपालास अटक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :02-Feb-2019
शेगाव,
निवासी असलेल्या प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी लाच स्वीकारणार्‍या शेगाव नगर परिषद मुख्याधिकारी अतुल पंत व रोखपाल आर.पी.इंगळेला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या, बुलढाणा पथकाने आज शनिवारी सकाळी 9 वाजता केली. या कारवाईमुळे येथील नगर परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 
 

 
 
 
 
शहरातील एका निवासी प्लॉटची वाणिज्य विषयक नोंद करण्यासाठी दस्तवेज पालिकेत सादर करण्यात आले. त्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच रोखपालाच्या मध्यस्थीने मुख्याधिकार्‍यांनी मागितली. त्यानंतर याप्रकरणी तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रपिबंधक विभाग बुलढाणा यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथील पालिकेचे रोखपाल आर.पी. इंगळे यांच्या घरी धडक दिली. त्याचवेळी या पथकातील काही कर्मचारी मुख्याधिकार्‍यांच्या घरी धडकले. दरम्यान रोखपाल आणि मुख्याधिकार्‍यांचे संभाषण झाले.
 
 
 
 
मुख्याधिकार्‍यांच्या सांगण्यावरून एक लाख 20 हजारात तडजोड करण्यात आली. तडजोडीची रक्कम स्वीकारताना रोखपाल आर.पी. इंगळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी दुसर्‍या पथकाने मुख्याधिकार्‍यांनाही ताब्यात घेतले. निवासी प्लॉटची वाणिज्यविषयक नोंद करण्यासाठी सुरूवातीला अडीच लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र, शेवटी एक लाख 20 हजार रुपयांवर तडजोड ठरली होती. याप्रकरणी मुख्याधिकारी अतुल पंत आणि रोखपाल आर.पी.इंगळे यांची कसून चौकशी सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगितले. या घटनेची वार्ता वार्‍यासारखी पसरली असून शेगाव पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.