वनऔषधीने शेती केली सृदृढ

    20-Feb-2019
Total Views |
यशोगाथा
विजय कुळकर्णी 
एकेकाळी शेतीला श्रेष्ठ दर्जा दिला जात होता. परंतु, अनेक कारणांमुळे शेतीची लागत (खर्च) व येणार्‍या उत्पन्नात दरी पडली. शेती शाश्वत व्हावी म्हणून सिंचन कृषी विभागाने अनेक योजना आणल्या. परंतु, देशात प्राथमिक क्षेत्र (73 टक्के) असलेल्या शेतीला चांगले दिवस हे दिवास्वप्नच ठरले आहे.

 
 
जगाचा पोशिंदा म्हणविला गेलेला शेतकरी कायम तोट्यात येणार्‍या शेतीमुळे आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिका घेऊ लागला. अशा परिस्थितीत शेतीला सावरण्याकरिता काही नवोपक्रमशील शेतकरी पुढे आले. काही नोकरदार अधिकारी सेवानिवृत्तीनंतर शेतीकडे वळले. शेतीला कसे फायदेशीर करता येईल, याकरिता मूल्यवर्धित पिकाकडे वळणे, प्रक्रिया उद्योग सुरू करणे, स्वतः पणन करणे, निर्यात करणे आदी उपाय पुढे आले. त्यातील एक मूल्यवर्धनाचा पर्याय म्हणजे वनौषधी शेती होय. पाटबंधारे विभागातून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले अभियंता सुरेश वामनराव मुकुंद यांनी मिळालेल्या पैशातून मौजे चिखली (लहान), ता. खामगाव, जि. बुलडाणा येथे शेती घेतली.
 
विहीर खोदून शेतात गाळाची माती टाकून जमिनीचा पोत सुधारला. पाण्याकरिता जवळच्या लांजुळ ल. पा. योजनेतून 2500 मी. अंतरावरून पाणी आणून बागायती शेती केली. पारंपारिक पिकात त्यांचे मन रमले नाही. जातीने लक्ष देऊन शेती करणारे मुकुंद चौकस बुद्धीचे, व्यवहारदक्ष व आदरातिथ्यशील वृत्तीचे असल्याने, त्यांनी वनौषधी वनस्पती असलेल्या पाषाणभेद (शिलाजीत अतिबला) या वनस्पतीची एका एकरात लागवड केली. 2018 च्या खरीप हंगामात जातीने उत्तम मशागत करून या वनौषधीचे पीक नुकतेच हार्वेस्टिंगवर (काढणीवर) आलेले आहे.
 
 काढणीपूर्वी प्रत्येक झाडापासून मिळणार्‍या उत्पादनाचे (आल्याचे) त्यांनी वजन करून चाचणी घेतली. या वनौषधीच्या मुळ्या लाल रंगाच्या असतात. त्या सुकवून टॉनिक म्हणून आयुर्वेदिक औषधात तिचा वापर केला जातो. मध्यम प्रतीच्या जमिनीतसुद्धा प्रत्येक झाडाला 750 ग्रॅम आले एवढी सरासरी लक्षात घेता, प्रतिहेक्टरी अंदाजे 7.50 टन एवढे. या कच्च्या मालाची खरेदी जागेवर केली जाते. परंपरागत पिकाच्या भावाची हमी नसल्याने नफ्याचीसुद्धा शक्यता मावळते.
एक उपक्रमशील अधिकारी म्हणून सुरेश मुकुंद हे खात्यात ओळखले जात होते. सेवानिवृत्तीनंतरही ते ज्येष्ठ नागरिक चळवळ, वाचन चळवळ व वाचनाप्रमाणे विषयवार नोंद ठेवण्याचे काम करीत आहेत.
 
सामाजिक कामातही ते हिरिरीने भाग घेतात. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी उत्तम शेतीचा परिपाठ देत वनौषधीसारख्या मूल्यवर्धित पिकाकडे शेतकर्‍यांना वळविण्याकरिता ही एक यशोगाधा आहे. शेतीकडे तरुणांनी वळावे व रोजगार शोधणारे होण्याऐवजी रोजगार देणारे व्हावे, असे म्हटल्यास वावगे होऊ नये. प्रसारमाध्यमे व आधुनिक संपर्क साधनांमुळे वनौषधीचा प्रचार-प्रसार वाढत आहे. लोकांना सर्वांगीण आरोग्याची महती कळली आहे. आरोग्य साक्षरतेमुळे आरोग्य जागरूकता वाढत आहे, एवढे मात्र निश्चित! पाषाणभेदाच्या झाडापासून त्यांची लागवड करता येते. 4-5 महिन्यांच्या या वनौषधी पिकामुळे शेतकर्‍याला मूल्यवर्धित पिकाचे सूत्र सापडण्यास मदत होईल, एवढे मात्र निश्चित!