बंजारा संघटनांकडून काँग्रेसचे खासदार खरगे यांच्या प्रतिमेचे दहन
   दिनांक :20-Feb-2019
मानोरा, 
शहरातील दिग्रस चौक येथे आठवडी बाजाराच्या दिवशी आज बुधवारी काँग्रेसचे राज्य प्रभारी खासदार मल्लिकार्जून खरगे यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी बंजारा समाजाचे शिष्टमंडळ दिल्लीत भेटण्यासाठी गेले असता त्यांनी बेताल वक्तव्य करुन समाज बांधवांना अपमानित केले. या घटनेचा निषेध म्हणुन विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी बंजारा क्रांती दलाचे युवा प्रदेश सरचिटणीस मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात त्यांच्या फोटो प्रतिमेचे दहन केले.
 

 
 
शिष्टमंडळाने खरगे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व देऊन महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेश, तेलंगाना या राज्यांतील बंजाराबहुल मतदारसंघापैकी काही जागांवर बंजारा समाजातील उमेदवाराला तिकीट देण्याची मागणी केली असता त्यांनी बंजारा समाजाच्या नेत्यांना अपमानास्पद वागणुक देऊन बंजारा समाजाचे लोकप्रतिनिधी निवडून आले तर ते पक्षाशी प्रामाणिक राहत नाही, मग यांना उमेदवारी कशासाठी द्यायची, अशी उर्मट आणि अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले. याचे तीव्र पडसाद समाजात उमटत आहेत. याचा समाजबांधवात तीव्र रोष व्यक्त होत आहे.
 
मल्लिकार्जून खरगे यांच्या बेताल वक्तव्याचा मानोरा येथील झेंडा चौकात बंजारा क्रांती दल, राष्ट्रीय बंजारा परिषद, वसंतराव नाईक मित्रमंडळ आणि इतर समविचारी संघटनाद्वारे फोटो प्रतिमेचे दहन करण्यात येऊन खरगे आणि काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध करण्यात आला.