इम्रान यांनी 'नो बॉल' फेकलाय : जावेद अख्‍तर
   दिनांक :20-Feb-2019
नवी दिल्‍ली :
पुलवामातील दहशतवादी हल्‍ल्‍यामुळे देशभरात पाकिस्तानचा विरोध केला जात आहे. यावर बॉलीवूड इंडस्‍ट्रीतील अनेक कलाकारांनी संताप व्‍यक्‍त केला आहे. त्‍याचबरोबर, बॉलीवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्‍यात आली आहे. पाकिस्‍तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी पुलवामा दहशतवादी हल्‍ल्‍याबाबत मांडलेल्या भूमिकेनंतर जावेद अख्‍तर यांनी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली आहे.
 
 
पुलवामा हल्‍ल्‍यात जर पाकिस्‍तानचा हात असेल तर भारताने पुरावे दाखवावेत, आम्‍ही दोषींविरोधात कडक कारवाई करूअसे इम्रान यांच्‍या वक्‍तव्‍यानंतर जावेद अख्‍तर यांनी त्‍यांना सडेतोड उत्तर दिले आहे.  जावेद अख्तर ट्‍विट करून म्हटले आहे की, इम्रान खान यांनी नो बॉल फेकला आहे. व त्‍यांनी नेहमीप्रमाणे विचारले आहे की, तुम्‍हाला कसे माहिती आहे की, हे आम्‍ही केले आहे. जावेद पुढे लिहितात, 'ज्‍यावेळी मुंबईमध्‍ये दहशतवादी हल्‍ला झाला होता, त्‍यावेळी एका पाकिस्तानी टीव्‍ही अँकरने मला विचारले होते की, हा हल्‍ला पाकिस्तानने केला होता कशावरून? अशाप्रकारचे हल्‍ले कुणीही करू शकतात? त्‍यावेळी मी त्‍यांना तीन पर्याय दिले होते व त्‍यापैकी एक निवडण्‍यास सांगितले होते. पहिला- ब्राजील, दुसरा-स्वीडन आणि तिसरा-पाकिस्तान'.
जावेद अख्तर यांचे हे ट्‍विट सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी पाकिस्तानातील कराची येथे आयोजित एका सांस्‍कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्‍यास नकार दिला होता.