अमरावतीत निवासी ज्ञान स्त्रोत व संशोधन केंद्र
   दिनांक :20-Feb-2019
-वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते शुक्रवारी भूमिपूजन
 

 
 
अमरावती,
महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीमधून रूक्मिणी नगर भागातील विद्यापीठ मालकीच्या जागेवर निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र इमारत बांधकाम भूमिपूजन समारंभ शुक्रवार, २२ फेब्रुवारी, रोजी दुपारी १.३० वाजता राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शुभहस्ते होणार असून डॉ.के.जी. देशमुख सभागृहात २ वाजता कार्यक्रम होईल.
 
समारंभाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर भूषविणार असून अतिथी म्हणून राज्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्राचे पालकमंत्री प्रवीण पोटे व राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्राचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील उपस्थित राहतील. याप्रसंगी विदर्भ पाटबंधारे महामंडळ, नागपूरचे उपाध्यक्ष तथा आमदार डॉ. सुनील देशमुख, राज्य शिक्षण हक्क परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे, महानगरपालिकेचे महापौर संजय नरवणे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार अरुणभाऊ अडसड, आमदार रवी राणा व प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
 
 
 
निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र इमारतीसाठी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी शासनाकडून पाच लक्ष रूपयाचा निधी मंजूर करून आणला असून कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनुसार हे केंद्र कार्यान्वित होत आहे. सदर इमारतीमध्ये तळ मजल्यावर पार्कींग, पहिल्या मजल्यावर कार्यालय, दुसर्‍या मजल्यावर १२० आसन क्षमतेचे श्रोतगृह, तिसर्‍याया आणि चवथ्या मजल्यावर १२५ विद्यार्थी क्षमतेची अभ्यासिका, पाचव्या मजल्यावर संशोधन कक्ष व धर्मशाळा आदी व्यवस्था या इमारतीमध्ये असणार असून शहराच्या मध्यभागी या निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र इमारतीचे निर्माण होत असल्यामुळे विद्यार्थांसाठी अधिक सोयीचे झाले आहे. विद्यार्थांना केंद्रबिंदूस्थानी ठेवून हे केंद्र सुरु होत आहे.
 
समारंभाला सर्व प्राधिकारिणी सदस्य, प्राचार्य, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील गणमान्य नागरिकांनी व विद्यार्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी कुलसचिव डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.