मोदींसोबत राहुल, प्रियांकाची तुलना अशक्य : शिवसेना
   दिनांक :20-Feb-2019
मुंबई,
कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कामगिरीत २०१४ पासून सुधारणा झाली आहे आणि त्यांना बहीण प्रियांका वढेरा यांचेही सहकार्य लाभत असले, तरी त्यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व कौशल्याशी करू शकत नाही, असे शिवसेनेने आज बुधवारी स्पष्ट केले आहे.
 
 
मागील काही वर्षांत सातत्याने टीका करणार्‍या शिवसेनेने दोन दिवसांपूर्वीच भाजपासोबत युती केल्यानंतर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. युतीबाबत सामान्य जनतेच्या मनात काहीच नसले, तरी या युतीमुळे विरोधकांचे मनसुबे उधळले गेल्याने ते सातत्याने टीका करीत आहेत, असे शिवसेनेने सामनामधील अग्रलेखात म्हटले आहे.
 
शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, असेही या अग्रलेखात स्पष्ट करताना, २०१४ पासून भाजपासोबत मतभेद असताना, राममंदिराची उभारणी होईल का, शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का, या प्रश्नांचे उत्तर सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. युती संदर्भातील प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करणे जास्त महत्त्वपूर्ण असल्याचेही या अग्रलेखात म्हटले आहे. युतीचा प्रस्ताव घेऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह स्वतःच ‘मातोश्री’वर आले होते, असे शिवसेनेने सामनामध्ये म्हटले आहे. शिवसेनेचे भाजपासोबत कोणतेही वैमनस्य नाही. मोदींसोबत मतभेद असतानाही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार रालोआचे घटक होऊ शकतात, तर शिवसेना का नाही, असा प्रश्नही विचारला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेसविरोधात तीव्र असंतोष होता आणि मोदींच्या बाजूने लाट होती. मात्र, यंदाची निवडणूक विचारधारा, विकासकार्य आणि भविष्यातील प्रश्नांवर होणार असल्याचेही शिवसेनेने स्पष्ट केले आहे.