अस्वलाच्या हल्ल्यात दोघे गंभीर
   दिनांक :20-Feb-2019
चंद्रपूर,
शेतातील कामे आटोपून लगतच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या दोघांवर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास चंद्रपूर तालुक्यातील ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मामला(चोरगाव) येथे घडली.
 
 
 
परशुराम कवडू कन्नाके व राजेंद्र गोविंद मरस्कोल्हे अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या रब्बी हंगाम सुरू असून, शेतकरी, शेतमजूर सकाळच्या सुमारास शेतकामासाठी घराबाहेर पडतात. नेहमीप्रमाणे परशुराम कन्नाके व राजेंद्र मरस्कोल्हे शेतात गेले. सकाळी ८.३० वाजेपर्यंत शेतातील कामे आटोपून लगतच्या जंगलात सरपण गोळा करीत होते. क्षणात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. जखमींनी आरडाओरड केली असता, लगतच्या शेतातील शेतकरी, शेतमजूर घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी आरडाओरड केली. त्यामुळे अस्वलाने जंगलाच्या दिशेने पळ काढला. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आली. घटनास्थळी धाव घेवून वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी पंचनामा केला. जखमींची प्रकृती सध्यास्थितीत ठिक असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे राठोड म्हणाले.