वेडिंगचा शिनेमा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
   दिनांक :20-Feb-2019
मुंबई,
लग्न म्हटल्यावर त्यासोबत तयारी, घरातील लगीन घाई, नातेवाईकांमधील रूसवे-फुगवे या सगळ्या गोष्टी असतातच. एका मध्यमवर्गीय मराठमोळ्या कुटुंबातील लग्नसोहळा आणि त्यावेळी घडणारी गंमत जंमत दाखवणाऱ्या 'वेडिंग चा शिनेमा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला आहे.
 

 
 
भारतातील पारंपरिक लग्नपद्धतीमध्ये काळानुरूप बदल होत गेले. लग्नापूर्वी वधू-वराचे प्री-वेडिंग फोटोशूट म्हणा किंवा संगीतमध्ये दोन्ही कुटुंबातील सदस्यांचे नृत्य सादरीकरण म्हणा आपल्याकडच्या लग्नसोहळ्यांचे स्वरूप हळूहळू बदलताना दिसते आहे. या बदलांना लग्नघरातील मंडळी कशी सामोरी जातात, त्यांची काय धांदल उडते, या सगळ्या गोष्टी आपल्याला टीझरमध्ये पाहायला मिळतात.
मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवाय, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही एक नवी जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले असून हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.