समर्थांची मैत्री संकल्पना
   दिनांक :21-Feb-2019
मित्र तो पाहिजे ज्ञानी । विवेकी जाणता भला ।
श्लाघ्यता पाहिजे तेथे । येह लोक परत्रही ।।
समर्थ यात सांगतात की- अभ्यासू, विवेकी, अंतर्बाह्य भला, सत्याने वागणारा, कीर्तीने स्मरणात राहणारा मित्र असावा. मैत्रीतले गुण समर्थांनी या श्लोकात सांगितले असावे, असे वाटते.
मुळात दोन सम विचारी एकत्र आले, तर तिथे ओघाने मैत्री ही आलीच. मग त्यात विचारांचे आदान-प्रदान अपेक्षित आहेच. याच विचारातून मैत्री दृढ होण्यास मदत होते. अशी दृढ मैत्री पुढे वर्षांन्‌ वर्षे टिकून असते.
आशेची मैत्री खोटी । दुराशा विटंबे पुढे ।
परोपकारणी मैत्री । ते मैत्री न विटंबे कदा
समर्थ म्हणतात की, एखादे काम साधून घेण्याचे हेतूने केलेली मैत्री खोटीच असते; कारण अपेक्षा पुरी होत नसेल तर ती मैत्री नाहीशी होण्यास वेळ लागत नाही.
बरेचदा असा अनुभव आपल्ल येतो की काम झाले की आपल्याला ती व्यक्ती विसरते. मग आपण विचार करतो की- हा असा का वागला असेल? म्हणून समर्थ सांगतात की, असं जाणवले तर वेळीच सावधान व्हा. आशेवर जगणारी माणसे पुढे निराशा पदरी पाडून घेतात. म्हणून वेळीच सावधान असावे. 
संग दोषे महादुःखे । संग दोषे दरिद्रता ।
संगतीने मद्भाग्य । प्राणी प्रत्यक्ष पावती ।।
समर्थ वाईट मैत्रीमुळे होणार्‍या त्रासाबद्दल यात सांगत आहेत.
समर्थ म्हणतात, संग म्हणजे सततचा सहवास. संग चांगल्या आदर्शांचा असणे हे सदभाग्य आणि हाच प्रगतीचा,कल्याणाचा राजमार्ग. असंगाशी संग ही तर प्राणाशी गाठ.
मैत्री करताना आपण कायम विचारपूर्वक असावे. सहवासामुळे मैत्री आणि मैत्र भाव हा अधिक खुलत जातो आणि हा भाव जपताना कायम सावध ही असावे. हे समर्थांना अपेक्षित आहे.
संग तो श्रेष्ठ शोधावा । नीच सांगात कामा नये ।
न्यायवंत गुणग्राही । यत्नाचा संग तो बरा ।।
शेवटी समर्थ सांगतात की, सततचा सहवास हा श्रेष्ठ शोधावा त्याच्याबद्दल चांगला विचार करावा. मैत्री करताना मैत्रीत असंख्य चांगले गुण बघून ते आत्मसात करावे. वाईट विचार असणार्‍याशी मैत्री करू नये. चांगला आणि सद्विचार या गुणांचा आग्रही असणारा, प्रसंगी, अभ्यासू, विवेकी, अंतर्बाह्य, भला, सत्याने वागणारा, कीर्तीने स्मरणात राहील, असा तो असावा.
यत्न तो देव मानावा, असे कळकळीने सांगणारे समर्थ आदर्श मैत्री यत्नाशीच करा, असे सांगून आपले मैत्री भाष्य पूर्ण करतात.
अशा या समर्थांची मैत्री संकल्पना या द्वयलेखनाला येथेच पूर्णविराम देतो आहे. नात्यातील सर्वात प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते म्हणून ज्याचा उल्लेख होतो. अशी मैत्री.मैत्री कायम वृिंद्धगत होत राहो, हीच सदिच्छा!
-सर्वेश फडणवीस